उद्योगबंदचा तळोजातील उद्योजकांचा इशारा
राज्याला दुष्काळाच्या झळा बसत असताना पाण्यासाठी उद्योजकही आक्रमक झाले आहेत. आम्हाला पाणी द्या, अन्यथा उद्यापासून उद्योग बंद करू, असा इशारा तळोजा औद्योगिक वसाहतीतील ६५० उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (टीएमए) सदस्यांनी दिला.
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सव्वा तीन वाजता या उद्योजकांची बठक झाली. या बैठकीत उद्योजकांनी अडचणींचा पाढा वाचला. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र उपक्रमाद्वारे गुंतवणूक आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना आहे त्याच उद्योगांना पाणी नाही, अशी खंत उद्योजकांनी व्यक्त केली. मात्र, पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उदंचन केंद्रातील शुद्धीकरण झालेले सुमारे २५ दशलक्ष घनमीटर पाणी मिळाल्यास हा प्रश्न निकाली निघू शकेल, असा पर्याय उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्यावर संबंधित पालिका व इतर विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.
६० तासही पाणी नाही
गेल्या दोन महिन्यांपासून तळोजातील उद्योजकांना आठवडय़ातील ६० तासही पाणी मिळत नाही. त्यामुळे आठवडय़ातील चारच दिवस उद्योग पाण्यावर चालतात. तसेच एमआयडीसीच्या नवीन पाणीकपातीच्या धोरणानुसार औद्योगिक वसाहतीला चार दिवसांत मिळणाऱ्या पाण्यात २५ टक्के कपात होणार असल्याने उद्योजकांमध्ये नाराजी आहे. टीएमएचे सदस्य यापूर्वी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही भेटले होते.