|| शहरबात : विकास महाडिक

परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातलेले असताना नवी मुंबईतील खारघरसारख्या शहरी भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ऐन पावसाळ्यात खारघरमधील ही पाणी आणीबाणी उन्हाळ्यात काय स्वरूप धारण करेल, याची कल्पनाच केलेली बरी. दोन आठवडय़ापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पाणी टंचाईचे पडसाद उमटले होते.

येथील साडेतीन हजार मतदारांनी नोटा मतांचा वापर करून आपली नाराजी व्यक्त केली. सिडको या उपनगराला पाणीपुरवठा करीत आहे. पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून येणारे पिण्याचे पाणी या नगराची तहाण भागवत आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार लखिना यांच्या संकल्पनेतून या नगराची उभारणी करण्यात आलेली आहे. नवी मुंबईतील काही त्रुटीं या नगरीच्या स्थापनेत दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. त्यातील विस्तीर्ण रस्त्यामुळे हे नगर इतर उपनगरांपेक्षा थोडे वेगळे वाटते, मात्र पिण्याच्या पाण्याची संभाव्य तरतूद करण्यात सिडको अपयशी ठरली असल्याचे पदोपदी जाणवत आहे. नवी मुंबई पालिकेने जलसंपदा विभागाचे अर्धवट सोडलेले खालापूर तालुक्यातील मोरबे धरण जोखीम उचलून घेतले नसते तर आज नवी मुंबईत पाण्यावरून रणकंदण माजले असते.

मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण विकत घेणारी नवी मुंबई पालिका हे दुसरी पालिका आहे. केवळ धरण विकत न घेता प्रक्रिया केंद्रापासून पालिकेने नवीन व्यासाची जलवाहिनी टाकलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराचा पाणी प्रश्न सध्या तरी निकाली निघाला आहे. सिडकोच्या विनंतीवरून खारघरला काही प्रमाणात पाणी देण्यात आले आहे. नवी मुंबई पालिका इतकाही दूरदृष्टी विचार शहरांचे शिल्पकार म्हणविणाऱ्या सिडकोला नाही. सिडकोने पाण्याचे स्रोत उभे करण्याचा प्रयत्न केला नाही, असे नाही. हेटवणे धरणासाठी आर्थिक मदत करून त्यातील पाण्यावर सिडकोने हक्क कायम ठेवला आहे. त्यामुळे आज सिडकोच्या दक्षिण नवी मुंबई भागाची काही अंशी तहान भागवली जात आहे. सिडकोने बाळगंगा आणि आता कर्जतमधील कोंढाणे धरणात सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

बाळगंगा धरणाचे पाणी जलसंपदा घोटाळ्यात गटांगळ्या खात आहे. कोंढाणे धरणाला अद्याप सुरुवात न झाल्याने ते पाणी नवी मुंबईत येईपर्यंत येथील लोकसंख्या दुप्पट वाढल्याचे चित्र दिसणार आहे. खारघर सारख्या दोन लाख लोकवस्तींच्या उपनगराची पाणी संकट सिडको सोडवू शकत नाही, यासारखे दुसरे अपयश नाही. खारघरच्या वाटय़ाला येणारे पाणी तळोजा वसाहतीला वर्ग केले जात असल्याने हा तुटवडा जाणवत असल्याचा खुलासा सिडकोच्या वतीने केला जात आहे. एमआयडीसीचे पाणी तळोजा भागाला पुरेसे मिळाल्यास खारघरवरील पाणी संकट दूर होईल असा दावा केला जात आहे. हेटवणे धरणापासून येणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे.

२५ वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही जलवाहिनी आता जुनी झाली आहे. काही ठिकाणी तिचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. ती फोडून पाणी घेणे सोपे झाले आहे. धरणावरील यंत्रणा गंजली आहे. अशा अनेक कारणामुळे हेटवणे पासून येणारे पाणी खारघरवसीयांच्या वाटय़ाला पुरेसे येत नाही. खारघरच्या वेशीवर येणाऱ्या या पाण्याचा पुरवठादेखील सुरळीत केला जात नसल्याने ही पाणी समस्या अधिकच बिकट झाल्याचे दिसून येते. येथील नागरिकांनी ही बाब मीटर रीडिंगनुसार लक्षात आणून दिली आहे.

सिडकोचे अधिकारी व कर्मचारी हे आता सुस्तावलेले आहेत. आपलं कोणीही वाकडे करू शकत नाही असा समज घेऊन येथील अधिकारी कर्मचारी वागत असल्याचे अनेकांना अनुभव आहे. त्यामुळे खारघरमधील पाणी समस्या गेली तीन ते चार वर्षे सातत्याने जाणवत आहे. मात्र तात्पुरती मलमपट्टी करून सिडको वेळ मारून नेत आहे.

सिडकोचे अध्यक्षच या भागातील आमदार प्रशांत ठाकूर आहेत. येथील पाणीटंचाईचा फटका त्यांच्या मतधिक्यावर झाला. त्यांचाही सिडकोच्या अधिकाऱ्यांसमोर नाइलाज झालेला आहे. पाण्याचे योग्य वितरण हे पाणीटंचाईला कारणीभूत आहे. खारघरसारख्या दोन अडीच लाख लोकसंख्येला सिडको पुरेसे पाणीपुरवठा करीत नसताना दररोज नवीन बांधकामे, गृहप्रकल्प सुरू होत आहेत. आहे त्या नागरिकांना पुरेसे पाणी न देता नवीन प्रकल्प उभे केले जात आहेत. सिडको स्वत: दोन लाख घरे बांधण्याची घोषणा करीत आहे. त्यातील अर्धी घरे ही खारघरमध्ये आहेत, पण या घरात राहण्यास येणाऱ्या रहिवाशांना पाणी कोण देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या दक्षिण भागात पाण्यावरून भविष्यात मोठा संषर्घ उद्भवण्याची स्थिती आहे.