रोडपाली परिसरात सिडको प्रशासन २९० घरांना टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. यंदा भरपूर नसला तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटविण्याइतपत पाऊस झाला असला तरी येथे पाणीटंचाईला सामोरे जावे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या रोडपाली नोड येथील सेक्टर १७ आणि २० येथील प्लॅटिनम वोरा, फिनिक्स हाइट, सौभाग्य हाइट्स, अलकनंदा या इमारतींतील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, दरम्यान, खारघरमध्येही पाणीटंचाईचा रहिवाशांना सामना करावा लागत आहे.

सिडको प्रशासनाने कळंबोली वसाहतीतील १ ते १० या सेक्टरचा परिसर २५ वर्षांपूर्वी वसवला. मागील पाच वर्षांत ११ ते २० सेक्टर हा परिसर वसवण्यात आला. सिडकोच्या नियोजनात अक्षम्य चुका असल्याने येथील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. उन्हाळ्यात या परिसरातील प्रत्येक सोसायटय़ांना (इमारतींना) टँकरने पाणी पुरवले जाते; मात्र हल्ली पावसाळ्यातही येथील चार मोठय़ा इमारतींतील नागरिकांना टँकरने पुरवठा केलेले पाणी प्यावे लागत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. खारघर येथील २१, २०, १२, ११, ५ सेक्टरमधील रहिवाशांची अपुरा पाणीपुरवठा हीच मोठी समस्या आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मागील आठवडय़ामध्ये सिडकोचे मुख्य अभियंता वरखेडकर यांचे लक्ष्य या समस्येकडे वेधण्यासाठी निवेदन देण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिले. तरीही अजूनही येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचे येथील रहिवासी सांगतात.

सेक्टर १२ या परिसरात बैठय़ा वसाहती असल्याने येथील पाण्याची मोठी समस्या आहे. सेक्टर १९ ते २१ या परिसरात मोठय़ा इमारतींमध्ये पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी रहिवाशांनी अतिरिक्त पाणी कर गोळा करून टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको वसाहतींमधील सध्याची पाणीपुरवठय़ाची व्यवस्था सुरळीत आहे. रोडपाली आणि खारघर येथील काही गृहनिर्माण संस्थांना कमी दाबाने पाणी मिळत असल्यास त्यांनी स्थानिक सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात तक्रार करावी. संस्थामधील अंतर्गत जलवाहिनी वेळीच तपासल्या जात नाहीत. त्यासाठी पुढाकार घ्यावा.

-दिलीप बोकाडे, सिडको पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी