पनवेल पालिका प्रशासनाचे जूनपर्यंतचे नियोजन

पनवेल : पुढील काळात निर्माण होणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेने नियोजन केले असून आता पनवेलकरांना आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात ६ हजार ३०० पाणी ग्राहकांना त्यामुळे आठवडय़ातील एक दिवस पाणी मिळणार नाही. पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी तीन पर्याय आहेत. यात देहरंग धरण हे पालिकेच्या मालकीचे आहे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडीसी आणि एमजेपीकडून रविवारी व सोमवारी पाणीपुरवठा कमी होत असल्याने पालिकेला देहरंग धरणातील पाण्याचा उपसा करावा लागतो. यामुळे धरणातील पाणी कमी पडत असून यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पालिका पाच महिने अगोदरपासून नियोजन करीत पाणी जपून वापरण्याचे आवाहन शहरवासीयांना करीत असते. या वर्षीचा शिल्लक साठा पाहता पालिकेने आता देहरंग धरणातून होणारा पाणीपुरवठा आता आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीही पालिकेने असे नियोजन केल्यामळे जून महिन्यापर्यंत नागरिकांच्या पाणीपुरवठय़ाच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले होते.  शहरासाठी अमृत योजनेचे काम सुरू झाले आहे. पाताळगंगा नदीतून यासाठी पाणी उपसा करण्यात येणार आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी किमान ३० महिने कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना कार्यान्वित होईपर्यंत शहरवासीयांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.

देहरंग धरणात १५०० एमएलडी पाणी

पनवेल शहराला ३२ दशलक्ष लिटर  (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये  ११ एमएलडी एमजेपीकडून तर ६ एमएलडी एमआयडीसीकडून आणि उर्वरित १५ एमएलडी पाणी देहरंग धरणातून घेतले जाते. सध्या देहरंग धरणात १५००  एमएलडी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हा साठा जून महिन्यापर्यंत शिल्लक राहावा यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरूअसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आर. आर. तायडे यांनी दिली.