18 January 2019

News Flash

उरणमध्ये प्रथमच कलिंगडाचा मळा

पारंपरिकरीत्या भात पिकवणाऱ्या उरणमध्ये प्रथमच कलिंगडाचा मळा फुलला आहे.

केणी यांच्या कलिंगडांना चांगली मागणी आहे.

चिरनेर येथे २० गुंठे शेतीत चार टन उत्पादन

उरण तालुक्यात शेतीत विविध प्रयोग करण्यात येत असून येथील एका शेतकऱ्याने उसाचे पीक घेतल्यानंतर अन्य एका शेतकऱ्याने कलिंगडाचे पीक घेतले आहे. पारंपरिकरीत्या भात पिकवणाऱ्या उरणमध्ये प्रथमच कलिंगडाचा मळा फुलला आहे. गजानन चांगा केणी असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून त्याने अवघ्या २० गुंठय़ात चार टनांपेक्षा अधिक कलिंगडांचे पीक घेतले आहे.

औद्योगिकीकरणामुळे उरणमधील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तरुण पिढी शेतीत रमत नाही, हेदेखील यामागचे एक कारण आहे. तीन-चार वर्षांपूर्वी येथील गोंधळी या शेतकऱ्याने पश्चिम महाराष्ट्रातून ऊस आणून तो पिकवला होता. सध्या दोन एकरांत उसाचे पीक घेतले जात आहे. याच ऊसाचा रस शेतकरी स्वत: विकत आहेत. चिरनेरमधील शेतकरी गजानन चांगा केणी यांनीही असाच प्रयोग केला आहे. त्यांनी आपल्या २० गुंठे शेतात कलिंगडे पिकवली आहेत. त्यासाठी त्यांना बियाणे व मजुरीसह १५ हजार रुपये खर्च करावा लागला आहे. ४ टनांपेक्षा अधिक कलिंगडे आल्याने त्यांना सुमारे ५० हजार रुपये मिळणार असून ३५ हजार रुपयांचा नफा होणार आहे.

उरणमध्ये कलिंगडाचे पीक घेतले जात नसल्याचे कारण विचारले असता, कलिंगडाची लागवड ही डिसेंबरमध्ये करणे गरजेचे असते, परंतु येथील शेतीत ओलावा शिल्लक राहात असल्याने ते शक्य होत नाही. तसेच कलिंगडासाठी लागणारे पाणीही उपलब्ध नसते. त्यामुळे हे पीक घेतले जात नसल्याची माहिती त्यांनी दिली.

आम्ही पिकवलेल्या कलिंगडांची पेण व पनवेलमधील किरकोळ बाजारात विक्री करण्यात येत आहे. ही कलिंगडे गोड असून, त्यांची साल पातळ आहे. त्यामुळे त्यांना चांगली मागणी आहे. पुढील वर्षी याहीपेक्षा अधिक जागेत कलिंगडांची लागवड करणार आहोत.

गजानन चांगा केणी, कलिंगड उत्पादक, उरण

उरणमध्ये भाजीचे पीक घेतले जाते, मात्र कलिंगडाचे पीक आजवर कोणीही घेत नव्हते. कलिंगडाला भाजीपेक्षा अधिक पाणी लागते. त्यामुळे तिथे हे पीक घेतले जात नाही.

के. एस. वेसावे, कृषी अधिकारी, उरण

First Published on April 12, 2018 2:11 am

Web Title: watermelon farming in uran