दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलअखेरीस सुरू होणार आहे. मात्र अद्यापही अनेक भागांतील शाळा सुरू झालेल्या नाहीत. तसेच करोना रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. त्या अनुषंगाने परीक्षांचे नियोजन, पालक, शिक्षकांकडून करण्यात येणाऱ्या मागण्या यांबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी राज्यभर करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्या पाश्र्वभूमीवर राज्य मंडळाने काय नियोजन केले आहे?

सध्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा सुरू होण्यास अजून जवळपास दीड महिन्यांचा कालावधी आहे. पुढील परिस्थितीचा अंदाज आताच लावणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे घाईने निर्णय घेऊन सध्याच्या नियोजनात काही बदल करणे योग्य नाही. नियोजनानुसार झाले नाही तर काय करायचे याचा विचार आता करण्यापेक्षा त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.

मुंबई, ठाणे परिसरातील शाळा वर्षभर सुरूच होऊ शकल्या नाहीत. इतर अनेक भागांतही सुरू झालेल्या शाळा आता पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांचा सराव नसताना प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्याव्यात?

लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणे अपेक्षित आहे. नियोजनानुसार जेथे शक्य आहे, तेथे त्या घ्याव्यात. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत एकत्र बोलावण्याची गरज नसते. तुकडय़ांमध्ये विद्यार्थ्यांना बोलवून परीक्षा घेतल्यास अंतराचे नियम, सुरक्षेची काळजी घेणे शक्य होईल. वाहतुकीवर सध्या काही र्निबध नाहीत. विद्यार्थी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जाऊ शकतात, तेथे परीक्षा घेता येतील. वर्षांच्या सुरुवातीलाच अभ्यासक्रम, काही घटकांचा भारांश कमी केला आहे. त्यात काही प्रात्यक्षिकेही कमी झाली आहेत. त्यामुळे ज्या शाळा सुरू आहेत, तेथे विद्यार्थ्यांचा सराव करून घेणे शक्य आहे. मुंबईत शाळा, महाविद्यालये सुरू नसली तरी काळजी घेऊन छोटय़ा गटांत प्रात्यक्षिके घेणे शक्य आहे.

परीक्षा ऑनलाइन घेणे, ५० टक्केच मूल्यांकन ग्राह्य़ धरणे, शाळास्तरावर घेणे असे काही पर्याय पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संघटनांकडून सुचविण्यात येत आहेत. त्याबाबत मंडळाचा काय विचार आहे?

अभ्यासक्रम आणखी कमी करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या मिळून जवळपास ३० ते ३२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेणेही शक्य नाही. ग्रामीण, दुर्गम भागांतूनही अनेक विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे परीक्षा दरवर्षीनुसार लेखीच होईल. परीक्षेच्या मूल्यांकन रचनेत किंवा पद्धतीत बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, परीक्षेचा आराखडा आयत्या वेळी बदलणे शक्य नसते. ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही योग्य ठरणार नाही. या दोन्ही टप्प्यांवरील परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. पुढील प्रवेश प्रक्रिया आणि अनेक गोष्टी या परीक्षांच्या निकालावर अवलंबून असतात. त्यामुळे ती काटेकोर, शिस्त राखून आणि सर्वासाठी समान पातळीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळास्तरावर परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. राज्यातील मुख्याध्यापकांनाही परीक्षांबाबत निर्णय घेताना विश्वासात घेण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रांचे नियोजन कसे असेल?

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या फेरपरीक्षांनी नियोजनाबाबतचा अंदाज आला आहे. सध्या एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थी बसवले जातात. त्यामध्ये फार बदल करावा लागेल असे वाटत नाही. शक्य असेल त्या ठिकाणी वर्गातील बाकांमधील अंतर वाढवले जाईल. आवश्यकता असल्यास उपकेंद्र घेण्यात येतील. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना यंदा दरवर्षीपेक्षा लवकर केंद्रावर बोलावण्यात येणार आहे. परीक्षांचा कालावधी यंदा बदलला आहे. अनेक ठिकाणी एप्रिलअखेरीस आणि मे महिन्यात खूप जास्त उन्हाळा असतो. त्यामुळे परीक्षेची वेळही बदलण्यात आली आहे. यंदा साडेदहा वाजता परीक्षा सुरू होईल. परीक्षा केंद्रावर गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.

जे विद्यार्थी परीक्षा देऊच शकणार नाहीत. त्यांच्याबाबत काय विचार करण्यात आला आहे?

आपल्याकडे नियमित परीक्षेच्या निकालानंतर फेरपरीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतील उत्तीर्णाना त्याच शैक्षणिक वर्षांत प्रवेश दिला जातो. यंदाही फेरपरीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी असणारच आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचेही वर्ष वाया जाणार नाही.

विद्यार्थ्यांसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. त्यादृष्टीने मंडळाने काही पावले उचलली आहेत का?

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरात ४५० प्रशिक्षित समुपदेशक नेमण्यात आले आहेत. परीक्षापूर्व, परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि परीक्षेनंतर येणाऱ्या अडचणी, ताण अशा तीन टप्प्यांवर विद्यार्थ्यांना मदत होऊ शकेल अशा ध्वनिचित्रफितीही तयार करण्यात येत

असून त्या समाजमाध्यमे, विभागाची यू-टय़ूब वाहिनी यांवर प्रसारित करण्यात येतील. अपंग विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र ध्वनिचित्रफितींची निर्मिती करण्यात येत आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाचे सचिव आणि साहाय्यक सचिवांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल. अनेक विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यात अडचणी येतात. लेखनिकांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येत आहे. संकेतस्थळावर स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून लेखनिक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या नागरिकांची नोंद करण्यात येत आहे.

मुलाखत – रसिका मुळ्ये