20 October 2019

News Flash

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उरणमध्ये विहीरसफाई अभियान

भूगर्भातील पाण्याची पातळी घटू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रायगड जिल्ह्य़ातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्य़ातील विहिरी सफाईची मोहीम हाती घेतली असून याचाच एक भाग म्हणून रविवारी उरणमधील श्री सदस्यांनी मिळून पिरवाडी आदिवासी वाडीवरील विहीर व वाडी साफ केली. यावेळी त्यांनी दहा टनापेक्षा अधिक कचरा साफ केला. ही या कामाची सुरुवात असून उरण तालुक्यातील इतर ठिकाणच्या विहिरींचीही सफाई करण्यात येणार असल्याचे श्री सदस्यांनी स्पष्ट केले.
भूगर्भातील पाण्याची पातळी घटू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्य़ांत पाणीटंचाईला जनतेला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच विविध पक्ष,पंथ, सामाजिक संस्थाही पुढे आल्या आहेत. ज्येष्ठ निरूपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या श्री सदस्यांनीही पाणी समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन, सफाई मोहीम तसेच तळ्याची सफाई आदी कामे करून या पंथाने आदर्श निर्माण केला आहे.सध्याच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशाने रायगड जिल्ह्य़ातील शेकडो जुन्या व निकामी ठरलेल्या विहिरींची सफाई करून त्यांचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे.त्याची सुरुवात अलिबाग येथून करण्यात आलेली होती.
रविवारी उरण तालुक्यातील पिरवाडी आदिवासी वाडी व न्हावा या दोन ठिकाणच्या विहिरींची तसेच गावांच्या सफाईची माहीम या सदस्यांनी राबविली.पिरवाडी वाडीत असलेल्या विहिरीत माती,गाळ साफ करून या विहिरीतील नैसर्गिक झरे मोकळे करण्यात आले आहेत.
त्यासाठी सदस्यांनी या विहिरीतील पाणी पंपाने काढून त्यानंतर विहिरीत खाली उतरून विहीर साफ केली.यावेळी नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच,माजी सरपंच तसेच इतर ग्रामस्थही उपस्थित होते.

First Published on May 31, 2016 3:21 am

Web Title: well cleaning campaign in uran to overcome the shortage of water
टॅग Water Shortage