कुटुंबीयांचीही काळजी; दररोज आढावा

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पोलीस दलातील १३५० पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा विळखा घट्ट होत असताना करोनाबाधित पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार ठरत आहे ते नवी मुंबई पोलिसांची ‘वेलनेस पथक’. हे पथक बाधितांसह त्यांच्या कुटुंबीयांची विविध आघाडय़ांवर काळजी घेत असून करोनाकाळात त्यांना ‘बळ’ देत आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी या पोलिसांसाठी या विशेष पथकाची निर्मिती केली होती. या उपक्रमाला पुढे नेत विद्यमान पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह पाठबळ देत आहेत. करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीच्या काळात दिवसरात्र काम करीत करोना योद्धय़ांची भूमिका पार पाडली. त्यांच्या आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने तत्कालीन आयुक्त संजयकुमार यांनी करोनाबाधित पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी हे पथक निर्माण केले.

या पथकात उपायुक्त सुरेश मेंगडे, प्रवीणकुमार, साहाय्यक आयुक्त विनोद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड आणि एन.बी.कोल्हटकर यांचा समावेश आहे. या माध्यमातून करोनाबाधित पोलिसांची काळजी घेतली जात आहे. हे पथक दररोज आढावा घेत आहे. करोनाबधित पोलिसांच्या कुटुंबीयांची वेळोवेळी चौकशी केली जात आहे. पालिसाला करोना संसर्ग झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय घाबरून जातात. हे पथक त्यांना मानसिक आधार देत आहे. वारंवार त्यांच्याशी संपर्कात राहत आहे.  पोलिसांसाठी डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या बाधित पोलिसांची भेट घेत त्यांनाही आधार देत आहेत.

आस्थेने चौकशी

बाधित पोलिसांच्या कुटुंबीयांची काळजीबरोबर हे पथक थेट रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही भेटत आहेत. आतापर्यंत पाचवेळा या पथकाने सुरक्षा साधनांचा वापर करीत रुग्णांची भेट घेतली आहे. मोठे अधिकारी आपली चौकशी थेट रुग्णालयत येऊन करीत असल्याने बाधित पोलिसांना करोनाशी लढताना बळ मिळत आहे.

पोलीस दलातील करोनाचा पाचवा बळी

पनवेल : नवी मुंबई पोलीस दलात करोनाचा विळखा घट्ट होत असून बुधवारी पाचवा बळी गेला. ५०  वर्षीय पोलीस हवालदार सुरेश सूर्यवंशी यांचा नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ सप्टेंबरला सूर्यवंशी यांना करोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. हवालदार सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी व १८ वर्षीय मुलगा आहे. सुकापूर येथे राहत असलेल्या हवालदार सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे नवी मुंबई पोलीस दल हादरले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील १३५० पोलिसांना आतापर्यंत करोनासंसर्ग झाला आहे. यापैकी ७५० पोलीस कर्मचारी व १०५ अधिकारी बाधित झाले आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी  ६०० जण बरे होऊन घरी परतले असून तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णावर डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.