वडापाव, सामोसे, डोसे यापलीकडे जात आता उपनगरांमधील कॉर्नरवरही पाश्चिमात्य चवीचे फास्टफूड सहज मिळू लागले आहेत. पूर्वी मुंबईतील काही भागांमध्येच हे पदार्थ मिळत होते. आता मराठमोळ्या डोंबिवलीतही अगदी सहजपणे विविध देशोदेशीच्या चवी चाखायला मिळू लागल्या आहेत. ‘दि फूडीज् कॉर्नर’ त्यापैकी एक.

सध्याच्या धकाधकीच्या युगात झटपट बनणाऱ्या आणि जिभेवर जास्तीत जास्त काळ चव रेंगाळणारे पदार्थ केवळ तरुणाईलाच नव्हे तर आबालवृद्धांना आवडू लागले आहेत. सुरुवातीला या पदार्थाना नाके मुरडणारी मंडळीही आता या पदार्थाच्या प्रेमात पडली आहेत. फास्टफूड हा सध्याचा परावलीचा शब्द आहे. डोंबिवली पूर्व विभागातील ‘दि फूडीज् कॉर्नर’मध्ये असे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची कायम वर्दळ दिसून येते. बेल्जियमच्या फ्रेन्चफ्राइजपासून थेट चिनी खाद्यसंस्कृतीमधील विविध पदार्थ आपल्याला या दि फूडीज कॉर्नरमध्ये चाखायला मिळतात.

या उपाहारगृहातील ‘हॉट व्हेज पिझ्झा’ लोकांच्या अधिक पसंतीचा आहे. रंगीबेरंगी भोपळी मिर्ची, मशरूम, बेबी कॉर्न यांसारख्या भाज्या व या उपाहारगृहात खास बनवला जाणारा सॉस तसेच विविध प्रकारचे चीज वापरून हा पिझ्झा बनवला जातो. चायनीज पदार्थाची येथे जास्त मागणी असते. येथील सोया चिल्लीला खवय्यांची विशेष पसंती आहे. कुडीस स्पेशल राइस ही या उपाहारगृहाची आणखी एक खासियत आहे.

कोणतेही कृत्रिम रंग व अजिनोमोटोसारख्या पदार्थाचा या भातामध्ये वापर केला जात नसल्याने खवय्ये आवर्जून या पदार्थाची शिफारस करतात. शीतपेयांमध्ये जिंजर-मिंट हे लोकांच्या आवडीचे शीतपेय आहे. इथे दर दिवशी साधारण १५ ते २० बर्गर विकले जातात. २ ते ३ किलो सॉस येथे दररोज बनवला जातो. या उपाहारगृहात पिझ्झा-बर्गरपासून चायनीज राइस खिशाला परवडेल, अशा किमतीत लोकांना मिळत असल्याने लोकांनी या उपाहारगृहाला विशेष पसंती दिली आहे. फ्रँकी प्रकारामध्ये व्हेज फ्रॅन्की, आलू फ्रँकी, मेयो फ्रँकी, पिझ्झा-बर्गरमध्ये स्पायसी पोटॅटो बर्गर, कॉटेज चीज बर्गर यांसारखे बर्गर आणि पनीर पिझ्झा, बारबिक्यू पिझ्झा असे तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ येथे मिळतात. फक्त खाद्यपदार्थच नव्हे तर पेय प्रकारातही इथे बरीच विविधता आहे. चहा, कॉफी, कोल्ड कॉफी, लेमन आईस टी यांसारखे पेय, बनाना मिल्क शेक, किवी मिल्क शेक, मँगो मिल्क शेक यांसारखे दूधयुक्त पेय, तर फ्रुट पंच, लेमन अ‍ॅन्ड ब्लॅकबेरी यांसारखी शीतपेयेही इथे मिळतात. अशा प्रकारे येथील खानपान व्यवस्था अतिशय उत्तम आहे.

१२ वर्षांचा उपाहारगृह व्यवस्थापनाचा अनुभव असणारे दीपक कुडीस हे स्वत: इटालियन व मेक्सिकन आचारी आहेत. त्यांच्या हाताची चव आपल्याला दुपारी १२.३० ते रात्री ८.०० या वेळेत बुधवार वगळता रोजच चाखायला मिळते. दीपक कुडीस यांच्याबरोबर आणखी मदतीचे चार हात आहेत. असे पाच जण मिळून हे उपाहारगृह चालवतात. सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास येथे खवय्यांची अधिक रेलचेल दिसून येते. उपाहारगृह दिसायला जरी लहान असले तरी पार्सल घेऊन जाणाऱ्यांची संख्या येथे जास्त आहे. डोंबिवली स्थानकापासून ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर असलेले हे ‘दि फूडीज कॉर्नर’ लोकांच्या लगेचच दृष्टीस पडण्यासारखे आहे.

दि फूडीज कॉर्नर

  • कुठे- शॉप नं. १०, भालचंद्र कृपा, मानपाडा रोड, शिरोडकर रुग्णालयाजवळ, डोंबिवली (पू.)
  • कधी- दुपारी १२.३० ते रात्री ८.००