कार्यवाही न करणाऱ्या सोसायटय़ांना महानगरपालिका आयुक्तांचा इशारा

ओला आणि सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या सोसायटय़ांचा  कचरा गोळा करण्यात येऊ नये, असे आदेश महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

शहरातील कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही घनकचरा विभागाद्वारे प्रभावीपणे करण्यास सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. तुभ्रे कचराक्षेपणभूमीला एकत्रित जाणाऱ्या सुमारे ६०० मेट्रीक टन कचऱ्यापैकी २१ मेट्रीक टन इतक्या कचऱ्याचे वर्गीकरण सोसायटय़ांकडून होऊ लागले आहे.  विशेष म्हणजे आयुक्त येण्यापूर्वी हे प्रमाण केवळ एक ते दीड टन इतकेच होते.

घनकचरा विभागाद्वारे शहरातील सर्व गृह निर्माण संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दोन ते तीन वेळा नोटिसा देऊनही कचऱ्याची विभागणी न करणाऱ्या सोसायटय़ांवर दंडात्मक कारवाई करणे, तसेच त्याचा कचरा न उचलणे असे आदेशच मुंढे यांनी दिले आहेत.

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था कचऱ्याचे वर्गीकरण करणार नाहीत. त्या सोसायटीचा सकाळच्या सत्रात कचरा उचलण्यास महानगरपालिकेची कचरागाडी पाठविली जात नाही. सोसायटीच्या पदाधिकांऱ्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यास फोन केल्यास ते आयुक्तांची आदेशाची माहिती देऊन दुपारच्या सत्रात कचरा उलचण्यासाठी गाडी पाठवत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनाही शिस्त येऊ लागली आहे. या प्रक्रियेचा  प्रभावी वापर केल्यानेच कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले आहे.  यांसदर्भात पालिका उपआयुक्त घनकचरा व्यस्थापनचे तुषार पवार यांनी सांगितले की, ओला व सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या सोसायटय़ांचा कचरा  पालिका उचलत नसल्याने सोसायटय़ांनी आयुक्तांच्या सूचनेला गंभीरपणे घेतले आहे.  त्यामुळे कचरा वर्गीकरणात आपोआपच वाढ झाली आहे. ही योजना आणखी प्रभावीपणे राबविण्यात येईल.