शेखर हंप्रस

तुर्भे

(प्रभाग क्रमांक ५६,५७, ६६, ६७, ६८, ६९,७०, ७१, ७२, ७३

झोपडपट्टीतील रहिवाशांची मागणी; धुळीमुळे नागरिक त्रस्त

नवी मुंबईतील तुर्भे परिसर हा झोपडपट्टीबहुल असून नागरिकांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे आरोग्य सेवा. अत्यल्प उत्पन्न गटातील लोक मोठय़ा प्रमाणात राहत असल्याने अत्याधुनिक सुविधा असलेले शासनाचे सुसज्ज रुग्णालय व्हावी ही येथील नागरिकांची मागणी प्रलंबित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या बरोबरच वाहन पार्किंग, डासांचा प्रादुर्भाव, वाहनांचा गोंगाट व धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत.

जुईनगरमधील काही प्रभागांचा समावेश या परिसरात उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये होतो. याच विभागात आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती येते. ठाणे-बेलापूर महामार्ग व बाजार समिती असल्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते.

नवी मुंबईतील इतर उपनगरांप्रमाणे वाहन पार्किंग ही या प्रभागातीलही समस्या आहे. या प्रभागात राज्य परिवहन सेवेचा बस आगाराचा भूखंड अनेक वर्षांपासून पडून आहे. यावर वाहनतळ उभारण्याची मागणीही प्रलंबीत आहे.

एकीकडे तुर्भे रेल्वे स्थानक व दुसरीकडे तुर्भे स्टोअर असून यामधून ठाणे बेलापूर महामार्ग जातो. येथील नागरिकांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने मोठी अडचण होते. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. याबाब तनागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी स्थायी समितीमध्ये या उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून नागरिकांना पुलाची प्रतीक्षा आहे.

प्रभाग रचना

प्रभाग ५६ ,५७, ६६, ६७ मध्ये पार्किंग आणि धुळीची मोठी समस्या आहे. प्रभाग ७३, ७१, ६९, ६८ मध्ये इंदिरा नगर, तुर्भे स्टोअर या भागाचा समावेश होतो. प्रभाग ५६, ५७ हा भाग वाशीतील असला तरी निवडणुकीसाठी तुर्भे विभागात येतो. ६६, ६७ या प्रभागांत तुर्भे गाव, जनता मार्केट हा परिसर येतो.

आरक्षणात अदलाबदल

सर्वच प्रभागात सर्वसाधारण महिला किंवा सर्वसाधारण असे आरक्षण होते. त्यात फक्त अदलाबदली झाली आहे. अपवाद प्रभाग ७०चा आहे. २०१५ मध्ये अनुसूचित जातीसाठी हा प्रभाग आरक्षित होता, आता सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक पत्नीची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

विद्यमान नगरसेवक

* प्रभाग ५६ : उषा भोईर (भाजप)

*  प्रभाग ५७ : विलास भोईर  (कॉंग्रेस)

*  प्रभाग ६६ : रामचंद्र घरत (भाजपा)

* प्रभाग ६७ : शुभांगी पाटील (भाजपा)

*  प्रभाग  ६८ : सुरेश कुलकर्णी (शिवसेना)

*  प्रभाग ६९ :  संगीता वास्के (शिवसेना)

*  प्रभाग ७० :  मुद्रिका गवळी (शिवसेना)

* प्रभाग ७१ : पूजा मेढकर (भाजपा)

* प्रभाग ७२ : शशिकला पाटील (भाजपा)

* प्रभाग ७३ : राधा कुलकर्णी (शिवसेना)

प्रभागनिहाय समस्या

नाल्याची दुर्गंधी

प्रभाग ५७ मध्ये सेक्टर १९ आणि सेक्टर २६ चा भाग येतो. या ठिकाणी नाल्याची समस्या गंभीर आहे. कांदा बटाटा, लसून मार्केट या प्रभागात असून बहुतांश भाग हा व्यावसायिक आहे. मलनिस्सारण वाहिन्यांच्या काम प्रलंबित आहे.

विभाग कार्यालय नूतनीकरणाकडे दुर्लक्ष

प्रभाग ६६ मध्ये तुर्भे गाव आणि सेक्टर २२ चा काही भाग येतो. रखडलेले काम म्हणजे तुर्भे विभाग कार्यालय. ही इमारत धोकादायक बांधकाम म्हणून घोषित करण्यात आली आहे. याला वर्ष झाले तरी ती नव्याने उभारण्यात आली नाही. हे कार्यालय जुईनगर येथे सांस्कृतिक भवनात सुरू आहे. तलावाचे सुशोभीकरण व गावठाण भागातील रस्त्यांची कामे झाली आहेत.

गढूळ पाणीपुरवठा

प्रभाग ६८ मध्ये तुर्भे स्टोअरचा भाग येतो. या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज या सुविधा असल्यातरी प्रत्येक घराच्या दर्शनी भागात छोटी दुकाने असल्याने वाहतूक कोंडी प्रचंड होते. त्याचा फटका ठाणे-बेलापूर रस्त्यालाही बसतो. याशिवाय गढूळ पाण्याची समस्या आहे.

वाहतूक कोंडी

प्रभाग ७२ मध्ये तुर्भे सेक्टर २३ आणि जनता मार्केटचा समावेश होतो. या प्रभागातही पार्किंगची समस्या आहे. प्रभागात असलेले मार्बल मार्केट कळंबोली येथे हलवण्यात आले असले तरी संगमरवरची मंदिरे बनवणारे काही कारखाने अद्याप येथे आहेत. गरिबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत असे सर्व स्थरातील लोक या ठिकाणी वस्तू खरेदीसाठी येतात त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहनांचा वावर असतो.

पार्किंगची गैरसोय

प्रभाग ५६ मध्ये कोपरीगावाचा समवेश होतो. या ठिकाणाची मोठी समस्या पार्किंगची आहे. गावठाण असल्याने रस्ते अरुंद आहेत. त्यात वाहनांचे संख्या वाढल्याने पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. बांधकामे करताना पार्किंगचे नियोजनच न केल्याने ही समस्या उभी राहिली आहे. नवीन स्मशानभूमी गावापासून दूर असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे जुन्या स्मशानभूमीचा वापर सुरू केला आहे. या प्रभागात अ‍ॅम्यूझन नावाचे चांगले उद्यान पालिकेने केले आहे.

मलनिस्सारण वाहिनीची दुरवस्था

प्रभाग ६७ मध्ये सेक्टर २० आणि २१चा भाग येतो. सेक्टर २१ येथील मलनिस्सारण वाहिनीची दुरवस्था झाली आहे. याचा सर्वाधिक त्रास पावसाळ्यात होतो. सेक्टर २० येथील मलनिस्सारण वाहिनीच्या कामाला मंजुरी मिळूनही काम झालेले नाही. दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात पाणी साठण्याची समस्या आहे. स्मशानभूमीचे काम सुरू असून शहरातील पहिले घडय़ाळ टॉवर या ठिकाणी उभारले गेले आहे.

कचराभूमीचा प्रश्न 

प्रभाग ६९ मध्ये गौरी क्वारी, एमआयडीसी आणि कचराभूमी परिसराचा समावेश होतो. यातील कचराभूमीची समस्या मोठी असून सततच्या दरुगधीने लोक त्रस्त आहेत. ही कचराभूमी अन्यत्र हलवावी म्हणून अनेकदा आंदोलने झाली मात्र अद्याप ही समस्या सुटलेली नाही.

धुळीचा त्रास

प्रभाग ७० मध्ये के.के.आर मार्ग, तुर्भे स्टोअरचा काही भागाचा समावेश होतो. या ठिकाणी धुळीची समस्या आहे. क्वारी भागात पावसाळ्यात पाण्याचे लोंढे मोठय़ा प्रमाणात वस्तीतून वाहत असल्याने त्याला मार्ग करून देण्याची मागणी प्रलंबित आहे.

पावसाळयात वसाहतीत पाणीे

प्रभाग ७१ मध्ये तुर्भेतील हनुमान नगरचा भाग येतो. या ठिकाणी रस्त्याची उंची जास्त आणि घरांची कमी झाल्याने सर्वात जास्त त्रास हा पावसाळ्यात सहन करावा लागतो. या शिवाय डासांची समस्या या प्रभागात मोठय़ा प्रमाणात असून मलनिस्सारण वाहिन्यांचे काम रखडले आहे.

संरक्षक भिंतीची मागणी प्रलंबित

प्रभाग ७३ मध्ये गणेश नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, इंदिरा नगरचा काही भाग आणि बोनसरी गावाचा समवेश होतो. यात बोनसरी भागातील नाल्याचा गंभीर प्रश्न असून पावसाळ्यात येथील रहिवासी जीव मुठीत धरून राहतात. याच ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

तुर्भे स्टेशन ते तुर्भे स्टोअर पादचारी पुलाची आवश्यकता आहे. ही समस्या सुटेल असे वाटले होते, मात्र आता बदललेल्या राजकीय स्थितीत हा पूल राजकरणात अडकणार असे दिसते. विकास कामात राजकारण करू नये.

– अनिल कांबळे

तुर्भे स्टोअर परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यापूर्वी हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. झोपडपट्टी पुनर्वसन होणे गरजेचे आहे.

-अनिल बाहेती

तुर्भे परिसरात आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अनेक तारांकित हॉटेल्स आहेत. रस्ते उत्तम आहेत मात्र वाहतूक कोंडीपासून सुटका कधी होणार.

-अनिता गाढे