राज्य सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सर्रास वापर केला जात असून नवी मुंबई व पनवेल पालिकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सिग्नलवर डस्टबिन बॅग विकणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. स्वच्छ भारत अभियानात देशात पहिले येण्यासाठी अनेक उपक्रम राबविणाऱ्या पालिकेला बंद प्लास्टिकचा प्रसार मात्र अद्याप पूर्णपणे रोखता आलेला नाही.

देशात मार्चपासून सुरू झालेला करोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत पालिकेची वैद्यकीय यंत्रणा व साफसफाई व्यस्त होते तर कर्मचारी अधिकारी जूनपर्यंत घरी सुरक्षित राहिल्याने या काळात प्लास्टिक वापराचा प्रश्न निर्माण झाला नाही. टाळेबंदी शिथिलीकरणापासून प्लास्टिकचा वापर वाढल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भात ऐरोलीतील एक स्वच्छाग्रही स्वाती टिल्लू यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना एक पत्र लिहून बंदी असलेल्या प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरू झाल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर जुजबी कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने प्लास्टिक बंदीबाबत असलेले नियमाचे एक पत्रक अनेक गर्दीच्या ठिकाणी वाटप केलेले आहे, मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. एपीएमसी बाजारातून घाऊक खरेदी करून आणलेली फळे आजच्या घडीस गर्दीच्या ठिकाणी सर्रास प्लास्टिक पिशवीबंद करून विकली जात आहेत. त्याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पालिकांची सर्व यंत्रणा ही कोविड साथरोगाचा सामना करण्यात गुंतलेली असून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोविडची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सप्टेंबरपासून सुरू झालेल्या उपाहारगृहातून घरपोच सेवा देताना या प्लास्टिकचा वापर पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत होते.

टाळेबंदीच्या काळात गृहनिर्माण सोसायटीतील घनकचरा व्यवस्थापनाचेहीदेखील बारा वाजले असल्याचे चित्र होते. गेल्या वर्षीच्या स्वच्छ भारत अभियानात पालिकेने देशात तिसरा क्रमांक पटकावलिा आहे. त्यामुळे आता पालिकेला पहिल्या क्रमांकाचे वेध लागले असून बंदी घातलेले प्लास्टिक हे या स्पर्धेत अडथळा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात आतापर्यंत ३१ टन प्लास्टिक जप्त महापालिकेने एप्रिल २०१९ ते मार्च २०२० दरम्यान १ हजार १३१ जणांवर कारवाई करून ३० हजार ८४५ किलो असे ३१ टन प्लास्टिक जप्त केले आहे. कारवाईत ६१ लाख ९१ हजार ७५० रुपये दंड वसूल केला आहे. मात्र मार्च २०२० नंतर करोनामुळे कारवाई थांबली असून प्लास्टिक वापर वाढला आहे.