कामोठेजवळील जुई गावातील घटना

जेवणाच्या ताटात मटण कमी वाढल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याची घटना कामोठेजवळील जुई गावात घडल्याचे बुधवारी उघड झाले. या घटनेनंतर पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

४ डिसेंबर रोजी आरोपी पतीने रात्रीच्या जेवणात मटणाचा बेत आखला होता. यासाठी त्याने पत्नीकडे जेवणासाठीचे सर्व साहित्य आणून दिले. कुटुंबीयांसमवेत जेवताना ताटात मटणाच्या फोडी कमी असल्याचा राग मनात धरून मद्यपान केलेल्या पतीने पत्नीवर रॉकेल ओतून तिला जाळले. यात ती गंभीररीत्या भाजली. या घटनेच्या वेळी आरोपीची चार मुलेही हजर होती. त्यांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडल्याने मुले हादरून गेली. त्यानंतर आरोपीने होरपळलेल्या अवस्थेतील पत्नीला डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती खालावल्याने तिला मुंबई पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला.

मृत्यूच्या काही तास आधी जबानी

बुधवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीररीत्या भाजलेल्या महिलेने स्टोव्हच्या भडक्याने ही घटना घडल्याचे जबानीत सांगितले होते, मात्र मृत्यूच्या काही तास आधी दिलेल्या जबाबात पतीने अंगावर रॉकेल ओतून जाळल्याचे स्पष्ट केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांचे पथक फरार पतीचा शोध घेत आहे.