खारघर, जांभुळपाडा, चिरनेर जंगलांत मानवनिर्मित वणवे

नवी मुंबई : खारघर टेकडी, जांभुळपाडा, गव्हाणफाटा, खारपाडा आणि चिरनेर या भागातील जंगलांना पावसाळ्यानंतर वणवे लागण्याचे वाढले आहे. जंगलांना वणवे लागत नसून ते लावले जात असल्याचे दिसून येत आहे. अशिक्षित आदिवासी प्राण्यांच्या शिकारीसाठी आगी लावतात, तर काही भूमाफिया या जमिनींवर अतिक्रमण करण्यासाठी अशा कारवाया करीत असल्याचे दिसून येते. हे वणवे लागू नयेत यासाठी वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती होत नसल्याची बाब उघड झाली आहे.

महामुंबई क्षेत्रात हजारो हेक्टर जमिन ही आजही वन विभागाच्या अखत्यारीत आहे. पावसाळ्यात हे सर्व डोंगर हिरवेगार दिसून येत असतात, मात्र पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर हिट मध्ये जंगलातील गवत सुकते. डोंगर पायथ्याशी राहणारे आदिवासी बांधव सुकी लाकडे आण काही वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी या आगी जाणुनबूजून लावत असल्याचे येथील काही पर्यावरण संस्थांचे मत आहे.

काही भूमाफिया जमिनी लाटण्यासाठी मोकळ्या करीत असल्याची चर्चा आहे. गुरुवारी जांभूळपाडा येथील डोंगरावर लागलेल्या आगीत तीन हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट झाली. या मार्गावरुन प्रवास करणारे पर्यावरण प्रेमी राजेंद्र मुंबईकर यांनी ही आग पाहिल्यानंतर वन विभागातील सुरक्षा रक्षकांच्या कानावर ही गोष्ट घातली. मात्र ते येईपर्यंत हा डोंगर बेचिराख झाला होता. पर्यावरणप्रेमींकडून प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.

आग नियंत्रणात आणण्यासाठी आगीच्या पुढे पुढील भागात चर खोदणे वा मातीच्या रेषा मारल्यास ही आग आटोक्यात येते, परंतु यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. डोंगरावर पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याने आग विझवण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे थोडय़ाच वेळात ही आग अनेक मैल पसरत असल्याचे आजवरच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अनकेदा वणव्यात केवळ वनसंपदा नष्ट होत नाही तर खूप मोठय़ा प्रमाणात वन्यजीव देखील भाजून मरत आहेत. खारफुटी नष्ट करण्यासाठी देखील ह्य़ा आगी लावल्या जात आहेत. बेलापूर येथील पालिका मुख्यालयासमोर काही दिवसापूर्वी अशा आग लावण्यात आली होती.  सरकारी यंत्रणा याबाबत सुस्त झाल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्यावरणप्रेमी जंगलाकडे धावतात. यात काही कार्यकर्त्यांना आग नियंत्रणात आणताना

भाजून जखमाही झाल्या  आहेत. जंगलांना आगी लावण्यासाठी काही  आदिवासी आघाडीवर आहेत. तर काही भूमाफिया डोंगरांना आगी लावत आहेत. त्यामुळे आदिवासींमध्ये जंगलांना  आगी लावण्यापासून रोखण्यासाठी  पर्यावरणप्रेमींनीआदिवासी तरुणांचे गट करून जागृती करण्यास सुरुवात केली आहे.

वनविभागाची डोळेझाक

महामुंबईतील टेकडय़ावर मोठय़ा प्रमाणात वणवे लागत आहेत. त्यातील अनेक आगी मानवाच्या हव्यासातून या आगी लावल्या जात आहेत, मात्र काही आगीच्या घटना नैसर्गिक आहेत का, याविषयी शंका आहेत, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. डोंगरांना आगी लावू नका, असे आदिवासींना सांगितले जात नाही. आगीचे प्रकार दरवर्षी घडतात, परंतु वनविभागाकडून अद्याप त्यावर कोणताही प्रतिबंधात्मक उपाय योजलेला नाही.

  •  सिडको प्रशासनाने या दुर्घटनांविषयी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. यासंदर्भात अनेक अधिकाऱ्यांनी काखा वर केल्या आहेत.
  •  खारघर ते चिरनेर पर्यंत कोणत्याही डोंगरात आगी लावण्यात आल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राजेंद्र मुंबईकर आणि त्यांचे सहकारी तातडीने धावून जातात.