सानपाडय़ातील संवेदना पार्कमधील सुविधा उद्घाटनानंतरही सुरक्षेविना

संतोष जाधव,नवी मुंबई</strong>

सानपाडय़ातील सेक्टर-१० ए आणि जुईनगर रेल्वे स्थानकानजीक उभारण्यात आलेल्या संवेदना पार्कचे  ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि महापौर  जयवंत सुतार  यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मात्र  पहिल्याच दिवशी पालिकेच्या  व्यवस्थेचे पितळ उघडे पडले. उद्यानाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूकच करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. तर उद्यान उघडण्याची आणि बंद करण्याच्या वेळा दर्शवणारा कोणताही फलक लावण्यात आला नसल्याने अनेकांचा गोंधळ उडाला.

शहरात अंपगांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असावे, या उद्देशातून सानपाडा येथे संवेदना उद्यानाची निर्मिती करण्यात आली. त्यात स्पर्श, गंध, ध्वनी आणि चव या पंचेंद्रियांना समोर ठेवून साहित्याची रचना करण्यात आली.

इटीसी केंद्राद्वारे एकाच छताखाली सर्वप्रकारच्या अपंगांना सामावून घेणारे देशातील एकमेव शिक्षण, प्रशिक्षण आणि सेवासुविधा केंद्र म्हणून नवी मुंबई पालिका नावाजली जात असताना दिव्यांग व्यक्तींकरीताही मनोरंजन स्थळ असावे हा दृष्टीकोन ठेवून निर्माण करण्यात आलेल्या या संवदेना उद्यानामुळे नवी मुंबईच्या नावलौकीकात लक्षणीय भर पडली.

तीन भागांत विभागलेल्या या विशेष व्यक्तींसाठीच्या उद्यानात पहिल्या भागात अपंग व्यक्तींना साजेशी अशी खेळणी, साधने, वृक्ष, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय सामान्य नागरिक, मुले, ज्येष्ठ नागरिक यांनाही साजेशा सुविधा उपलब्ध आहेत. मधल्या भागात संपूर्ण हिरवळ व पाण्याच्या छोटे हौद ठेवून त्यात कमळ व इतर तरंगत्या पान वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या भागात योग साधना करण्यासाठी प्रशस्त जागा व इतर सुविधा आहेत.

मागणीनंतरही पालिकेचे दुर्लक्ष

संवेदना पार्कमधील साधनांची नव्याने डागडुजी करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी संरक्षणासाठी या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे. ती ठेवली न गेल्यास येत्या काही दिवसांत या उद्यानाचे सौंदर्य बिघडण्याची भीती आहे. या उद्यानाच्या उद्घाटनावेळी तात्काळ सुरक्षारक्षक नेमावेत तसेच उद्यनाचे क्षेत्रफळ पाहता चांगल्या उद्यनाची व्यवस्था ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावावेत अशी मागणी केली होती.त्याकडेही दुर्लक्ष होत आहे.पालिकेकडे लेखी पत्रव्यवहारही केला आहे.पण पालिका दुर्लक्ष केले जात असल्याचे नगरसेविका श्रचा पाटील यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने नुकतेच तयार करण्यात आलेल्या उद्यनाच्या सुरक्षेबाबत तसेच प्रवेशद्वारावर उद्यानाची वेळ टाकण्यात येईल.तात्काळ सुरक्षारक्षकांबाबत खबरदारी घेण्यात येईल.

– नितीन काळे, उपायुक्त उद्यान विभाग