पनवेल : पनवेल शहरातील समीर लॉजवर १८ दिवसांपूर्वी विषबाधेमुळे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या महिलेला तिची प्रकृती बरी झाल्यावर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेने तिच्या मुलीची हत्या केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होता.

लीजी कुरीयन असे या महिलेचे नाव असून लीजी व वाशीम अब्दुल कादीर या दोघा प्रेमीयुगुलांनी मिळून लीजीचे पती रिजोश याचा खून करून हे युगुल केरळ राज्यातून फरार झाले होते. ते पनवेलमधील समीर लॉजमध्ये राहात होते. ९ तारखेला लॉजमधील खोलीचा दरवाजा उघडत नाही म्हणून आत प्रवेश केल्यावर या दोघा युगुलांसोबत दोन वर्षांची लहान बालिका बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बालिकेचा मृत्यू झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी बालिकेची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात युगुलांवर उपचार सुरू होते. मंगळवारी लीजी कुरीयनची प्रकृती बरी झाल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यावर तिला अटक करण्यात आली. वाशीमवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.