नियोजित नाटय़गृहाच्या भूखंडावरील डबक्यात उडी

ऐरोली सेक्टर ४ येथे नाटय़गृहासाठीच्या भूखंडावरील डबक्यात सोमवारी महिलेने मुलासह आत्महत्या केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे नाटय़गृह उभारण्यासाठी येथे काही वर्षांपूर्वी पाया खोदण्यात आला होता, मात्र ठेकेदाराने काम थांबविल्यामुळे पायासाठीच्या खड्डय़ाचे रूपांतर एका भल्या मोठय़ा तळ्यात झाले आहे. त्यात सोमवारी या शोभा वाळिंबे या महिलेने मुलगा अर्जूनला (६) कमरेला बांधून आत्महत्या केली. तिचा मृतदेह मंगळवारी तरंगताना दिसला. शोभा यांना क्षयरोग झाला होता.

शोभा वाळिंबे या दोन-चार महिन्यांपासून क्षयरोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्या पतीनेही दोन वर्षांपूर्वी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. शोभा यांच्या कुटुंबीयांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी रबाळे पोलीस ठाण्यात केली होती. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेनंतर ऐरोलीतील नाटय़गृहाच्या रखडपट्टीचीही चर्चा सुरू झाली असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.