एमजीएम रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

शिकाऊ डॉक्टरने दात काढताना झालेल्या कथित चुकीमुळे पुष्पा पांडे (वय ५५) या महिलेला मंगळवारी आपला जीव गमवावा लागला. मुलीकडे लग्नसमारंभासाठी आलेल्या पांडे यांच्यावर कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात (एमजीएम) हे दंतोपचार सुरू होते. रुग्णालयाने मात्र हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला आहे.

मंगळवारी दुपारी दात काढताना त्यांना खूप वेदना झाल्या. त्यांनी तसे सांगूनही डॉक्टरांनी दात काढणे सुरूच ठेवले. त्या कळा असह्य़ होऊन त्यांचा मृत्यू ओढवल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक राज पांडे यांनी केला आहे. त्यांचे पती अवधेश यांनीही याला दुजोरा दिला. पुष्पा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर शिकाऊ होते. तज्ज्ञ डॉक्टर सोबत असते तर ही घटना घडली नसती, असा नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालयाने मात्र वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, असा दावा केला आहे.

पुष्पा यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. परंतु दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुष्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयातून हलविण्यात आला नव्हता. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात पांडे यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीमुळेच पुष्पा यांना प्राण गमवावे लागल्याचे पांडे यांनी म्हटले. मात्र पांडे यांच्या या आरोप रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी मात्र फेटाळून लावले आहेत.

या घटनेबाबत एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. एल. सलगोत्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण दंत वैद्यकीय महाविद्यालयात घडले असल्यामुळे तेथील वैद्यकीय अधीक्षक सविता राम यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, सविता राम यांच्याशी संपर्क साधला पण तो होऊ शकला नाही.