उरण तालुका आणि शहर परिसरात सध्या तहान्या व लहान मुलांना कडेवर घेऊन तरूण मुली भीक मागीत असून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वेळी या महिला नागरिकांना सातत्याने अंगाला हात लावून त्यांच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत कळवला आणत जोपर्यंत समोरचा माणूस काही देत नाही, तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत असल्याने नागरिक व महिलाही त्रस्त झाल्या आहेत. तसेच शहरातील व्यावसायिकही या भीक मागणाऱ्यांमुळे त्रस्त होऊ लागल्याने नागरिक तसेच व्यावसायिकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उरणच्या मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या गणपती चौक, मॉन्जिनीज केक, साठे हॉटेल तसेच, स्टेट बँक आदी ठिकाणी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना भिकाऱ्यांचा त्रास होऊ लागला आहे. कपडय़ात गुंडाळलेल्या लहान मुलांना कडेवर घेऊन मुलासाठी काही तरी द्या, अशी भावनात्मक मुद्रा करून या लहान वयातील मुली भीक मागीत आहेत. दररोज बाहेरून येणाऱ्या या महिलांसोबतच तीन ते सात वयाची अल्पवयीन मुलेही भीक मागत आहेत. अनेक नागरिक या महिलांना व मुलांना खाऊ किंवा पैसे देतात, मात्र थोडय़ा वेळात पुन्हा एकदा त्याच ठिकाणी ते येऊन दुसऱ्यांकडून भीक मागत असतात. अनेकदा रस्त्याच्या कडेला उभे राहून बाजारात गप्पा मारत असलेल्या लोकांच्या अंगाला हात लावून सताविण्याचेही प्रकार सुरू आहेत. महिला तान्हय़ा मुलांना घेऊन असल्याने काही करता येत नसल्याचे मत उरणमधील नागरिक महेश घरत यांनी व्यक्त केले आहे. तर लहानग्यांना नाश्ता दिला असता ते पुन:पुन्हा येऊन आम्हाला त्रास देत असल्याची माहिती साठे हॉटेलचे मालक विजय साठे यांनी दिली. या संदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता अशा भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच हे कोठून येतात त्याचाही तपास करून पोलिसांची नेमणूक करून, ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होत आहे. तो बंद केला जाईल, अशी माहिती त्यांनी या वेळी बोलताना दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 2:27 am