पनवेल पालिकेवर मोर्चा; अधिकाऱ्यांना विचारला जाब

पनवेल : पाणीटंचाईत घरात दररोज एक हंडा पाणी येत असल्याची तक्रार करत सोमवारी पनवेलमधील कच्छी मोहल्लामधील महिलांनी पनवेल पालिकेची इमारत गाठली. सकाळी संतप्त महिलांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठय़ा शिताफीने महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देत शांत केले. मात्र त्यानंतर दुपारनंतर पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच परिसरातील महिलांचे नेतृत्व करत पालिकेची इमारत गाठली.

घरात एक हंडा पाणी येत असल्याने आम्ही रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास कसा सोडायचा, उदरनिर्वाह कसा करायचा? असा संतप्त सवाल महिलांनी पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासमोर उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे स्थानिक अधिकारी नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याऐवजी फोनवर बोलणे पसंत करतात, अशा अधिकाऱ्यांना सौजन्याने वागण्याचे तरी शिकवा, असा आरोप या महिलांनी केला. पाण्याविना संसाराचा गाढा पनवेलकर गृहिणी कशा चालवतात, याचा पाढाच सोमवारी सकाळी महिलांना उपायुक्त लेंगरेकर यांच्यासमोर वाचला.

जून महिन्यात पावसाळा येईल आणि पनवेलकरांच्या हक्काच्या धरणातून पनवेलकरांची तहान भागवायची, असे ढोबळ नियोजन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे आहे. या पाणीटंचाईमध्ये पनवेल शहरातील सामान्य गृहिणी सर्वाधिक भरडल्या जात आहेत.

उन्हाळ्याची पाण्याची टंचाई पनवेलकरांनी मागील अनेक वर्षांपासून मान्य केली आहे. मात्र पाणीपुरवठय़ातील चुकीच्या नियोजनामुळे नागरिक त्रासले आहेत. पाण्यासाठी रात्रीचे जागरण पनवेलकरांच्या नशिबी पनवेल पालिकेने थोपले आहे. पाणी रात्री अडीच वाजता येणार की तीन वाजता की पहाटे चार वाजता याची अचूक वेळ पालिकेचा पाणीपुरवठा विभाग पनवेलकरांना सांगू शकत नाही. त्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या सदस्यांनी स्वत:ला जागरणासाठी आळीपाळीने नेमले आहे.