नवी मुंबई पोलिसांपुढे प्रश्न, महिला सुरक्षा अ‍ॅपचा अल्प प्रमाणात वापर

महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य पोलिसांनी तयार केलेल्या ‘प्रतिसाद’ अ‍ॅपचा नवी मुंबईतील महिलांकडून फारसा वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१६ पासून सेवेत असलेल्या या अ‍ॅपचा फेब्रुवारी २०१७ पर्यंत नवी मुंबईतील अवघ्या ५५४ महिलांनी वापर केला. संकटसमयी महिलांनी या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतिसाद अ‍ॅप १५ जून २०१६ पासून सुरू करण्यात आले. राज्यात जवळपास १ लाख नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून अ‍ॅपवर आलेल्या ८००० पेक्षा जास्त तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून महिलांना येणारे निनावी फोन कॉल्स, मिस्ड कॉल्स, फेक कॉल्स यांसारख्या समस्यांचेही ही निराकरण करण्यात आले आहे.

मानसरोवर येथील रिया सांगते की, प्रतिसाद अ‍ॅपचा मला खूप उपयोग झाला. मला एक मुलगा त्रास देत असे. या अ‍ॅपवर मी तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी ताबडतोब निवारण केले. रस्त्यात किंवा अन्यत्र कुठेही काही समस्या निर्माण झाल्यास अ‍ॅपमुळे पोलिसांची लगेच मदत मिळते. पनवेलला राहणाऱ्या समिधा उरणकर सांगतात, माझे पती कामानिमित्त नेहमी बाहेरगावी जातात. त्यामुळे मी हे अ‍ॅप डाऊनलोड करूनच ठेवले आहे. कॉल केला तरी लगेच रिस्पॉन्स मिळतो. नातेवाईकांनाही आपल्या लोकेशनचे मेसेज जातात. रात्री प्रवासातदेखील केवळ एका क्लिकवर मदत मिळते. एका पोलीस निरीक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या अ‍ॅपच्या फायद्यांविषयी विविध शिबिरांतून किंवा समाजमाध्यमांतून जनजागृती करण्यात येते, परंतु तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

सिटिझन कॉप अ‍ॅप

नवी मुंबई परिसरातील नागरिकांसाठी ‘सिटिझन कॉप’ हे अ‍ॅप डिसेंबर २०१४ मध्ये सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०१५ पासून मार्चपर्यंत २१,६०२ जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. या अ‍ॅपवर आलेल्या १७७ तक्रारींपैकी ६९ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.

महिलांसाठी उपयुक्त हेल्पलाइन

’टॅक्सी किंवा ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्यांसाठी फ्री मेसेज हेल्पलाइन- ९९६९७७७८८८

’महिलांसाठी आप्तकालीन हेल्पलाइन-१८१

’महिलांसाठी खास पोलीस हेल्पलाइन-१०३/१०९०/७७३८१३३१३३/७७३८१४४१४४

’बेस्ट बसमध्ये छळ झाल्यास हेल्पलाइन-१८००२२७५५०

संकटकालीन परिस्थितीत व्यक्तीची लोकेशन नातेवाईकांना माहीत असणे आवश्यक आहे. विशेषत: महिलांसाठी ‘प्रतिसाद’ अत्यावश्यक आहे. हे नि:शुल्क मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाला जीपीएसच्या माध्यमातून लोकेशन शोधता येते आणि मदतीसाठी पोलीस लवकर पोहोचू शकतात.

– हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

‘प्रतिसाद’ अ‍ॅपबरोबरच केवळ नवी मुंबई परिसरातील नागरिकांसाठी ‘सिटिझन कॉप’ हे अ‍ॅप डिसेंबर २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. त्यात नागरिक परिसरातील गुन्ह्य़ांची माहिती ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात पोस्ट करू शकतात. विविध प्रकारच्या गुन्ह्य़ांची माहिती देता येते. पोलीस ठाण्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्याचा उपयोग जास्तीतजास्त करावा.

– प्रदीप कन्नलु, साहाय्यक आयुक्त, बिनतारी यंत्रणा

महिलांनी ‘प्रतिसाद’ या अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग करणे फायदेशीर आहे. कठीण परिस्थितीत जीपीएसद्वारे लोकेशन मिळत असल्यामुळे कमीतकमी वेळात ताबडतोब मदत मिळते. या अ‍ॅप्लिकेशनचा खूप चांगला अनुभव महिलांना आला आहे.

– प्रभात रंजन, पोलिस महासंचालक, मुंबई

या अ‍ॅप्लिकेशनसाठी डेटा कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. डेटा कनेक्टिव्हिटी नसल्यास मेसेज जाण्यास उशीर होतो व लोकेशन डिटेक्ट करण्यास विलंब होतो. संकटात सापडलेल्या महिलेला केवळ एका क्लिकवर मदत मिळण्याची सोय करण्यात आली आहे. महिला या अ‍ॅपचा वापर प्रवासात करू शकतात.

– शहाजी उमप, उपायुक्त झोन-६ मुंबई