खोपटा येथे गणेशोत्सवानिमित्त बाल्या नाचाच्या स्पर्धा भरविल्या जात आहेत. या स्पर्धेत पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलांनीही बाजी मारली आहे. पारंपरिक गाण्यांवर घुंगरांच्या तालावर महिला ठेका धरीत आहेत. पारंपरिक गाण्यांना आता सामाजिक जाणिवेचाही स्पर्श लाभत असून ७४ वर्षांपासूनची परंपरा जपली जात आहे.

उरण येथे गौरा गणपतीची प्रथा आहे. या प्रथेच्या निमित्ताने खोपटा येथे शिवगौरा उत्सवात बाल्या नाचाची स्पर्धा भरविली जात आहे. या स्पर्धेत शक्तीवाले व तुरेवाले असे दोन संघ भाग घेतात. ‘गण्या धाव रे, मला पाव रे..’ हे गाणे बाल्या नाचासाठी प्रसिद्ध असून छोलकीवर थाप देत उडत्या चालीच्या गाण्यांचा समावेशही या नाचात केला जातो. पूर्वी या नाचाला फक्त करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जायचे; परंतु आता या नाचाच्या स्पर्धा भरविल्या जाऊ लागल्या आहेत. नाचाच्या सादरीकरणाचेही स्वरूप बदलत असून नवीन हिंदी किंवा मराठी चित्रपटातील प्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या चालीचा आधार घेऊन कवणे रचून गाणी म्हटली जात आहेत. या गाण्याच्या ध्वनिमुद्रित (कॅसेटही) तयार करून त्याची बाजारातून विक्री केली जाते. स्पर्धेसाठी विविध नाच मंडळे तयार करण्यात आलेली आहेत. या नाचातील अर्धी पँट आणि गळ्यातील रुमाल या पारंपरिक पोशाखाची जागा आता फुल पँट आणि रंगीबेरंगी पोशाखाने घेतली आहे. त्याचप्रमाणे या नाचांच्या स्पर्धेत आता सध्यस्थितीचा आढावा घेणारी व समाजात जनजागृती करणारी गीते कवींकडून रचली जात आहेत. यामध्ये स्त्रीभ्रूणहत्या विरोध, महागाई, बेकारी तसेच समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांविरोधात जागृती करणारी गीते सादर केली जातात.