कामगार संघटनांना ३० टक्के वेतनवाढ हवी
जेएनपीटी बंदरातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी जेएनपीटी प्रशासन भवनात बैठक झाली. या बैठकीत जेएनपीटी व्यवस्थापनाने मूळ वेतनात १० टक्केची वाढ देण्याचा प्रस्ताव आणला असता तो कंत्राटी कामगार संघटनांनी फेटाळून लावला आहे. त्याऐवजी कामगारांना ३० टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव आणावा अशी मागणी व्यवस्थापनाकडे करण्यात आली असल्याची माहिती कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या वेतनवाढीसाठी कंत्राटी कामगारांचे आंदोलन पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बंदरातील कंत्राटी कामगारांना सध्या प्रतीदिन ४२१ रुपये वेतन मिळत आहे. यामध्ये दहा टक्के वाढ करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रस्ताव होता. वेतन करारात अनेक जाचक अटी टाकण्यात आल्याची माहिती जेएनपीटीचे कामगार नेते भूषण पाटील यांनी दिली. कंत्राटी कामगार विविध कंत्राटदारांच्या सोबत काम करीत असले तरी ते जेएनपीटीसाठी करीत असून कामगारांना किमान वेतन व सुविधा देण्याची तसेच त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी जेएनपीटीचे आहे, असे असले तरी ही जबाबदारी झटकण्यासाठीच करारात अटी टाकण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे यात सर्व कामगारांना वेतनवाढ न देता ठरावीक कामगारांनाच वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव असल्याने तो फेटाळून लावला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
बैठकीत जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक व सचिव डी.नरेश कुमार, वरिष्ठ व्यवस्थापक ए.जी.लोखंडे त्याचप्रमाण न्हावा शेवा बंदर कामगार संघटना व जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील व कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आता व्यवस्थापनाकडून येणाऱ्या नव्या प्रस्तावानंतरच चर्चा केली जाणार आहे.