तीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या बीएमटीसी या सिडकोच्या परिवहन उपक्रमातील एक हजार ५८७ कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून लघुउद्योगांसाठी शंभर चौरस फूट क्षेत्रफळाच्या गाळ्यांसाठी जागा मिळणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या माजी कर्मचारी व कामगार नेत्यांबरोबर शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला. वाणिज्यिक वापरातील या गाळ्यांबरोबरच बीएमटीसीच्या ६३१ कर्मचाऱ्यांची गॅ्रच्युईटी व २७१ कर्मचाऱ्यांचे थकीत भविष्य निर्वाह निधी देण्यास तयार झाली आहे. बीएमटीसी कामगार व त्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याने या कामगारांत आनंद व्यक्त केला जात आहे.
शहरांचे शिल्पकार म्हणविणाऱ्या सिडकोने नवी मुंबईसाठी सर्वप्रथम एप्रिल १९७२ रोजी स्वतंत्र परिवहन सेवा सुरू केली होती. या सेवेचे पहिले नाव सिडको बस सव्र्हिस असे होते. त्यानंतर तिला स्वतंत्र दर्जा देताना १९७९ मध्ये तिचे बॉम्बे मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट कॉपोरेशन (बीएमटीसी) असे नामांतरण करण्यात आले. सुमारे अडीचशे प्रवासी बसेस व सतराशे कर्मचारी संख्या असलेली ही परिवहन सेवा त्यावेळी नवी मुंबईची धमनी मानली जात होती. फेब्रुवारी १९८४ मध्ये कर्मचारी कामगार संघटना व बीएमटीसी प्रशासनात झालेल्या संघर्षांत ही चांगली बससेवा नंतर कायमची बंद पडली. त्यामुळे एक हजार ७४० कर्मचारी रातोरात रस्त्यावर आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची या सेवेवर मोठी खप्पामर्जी झाली होती. जानेवारी १९८४ मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्यहक्कांसाठी माजी खासदार दिबा पाटील यांनी उभारलेला जासई येथील संघर्ष चिघळला होता. त्यात या बीएमटीसी कामगारांनी सहभाग घेऊन प्रवासी वाहनांचा गैरवापर केला अशी चर्चा आहे. त्यामुळे ही सेवा भंगारात विकावी लागली तरी ती पुन्हा सुरू केली जाणार नाही, असा पवित्रा शासनाने घेतला आणि त्याप्रमाणे डिसेंबर ११९० मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही सेवा नंतर भंगारात विकण्यात आली. तुर्भे, रबाले यासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेले आगार सिडकोने नंतर नवी मुंबई पालिकेच्या परिवहन (एनएमएमटी) उपक्रमाला दिले. या सर्व संघर्षांत कामगारांना बेकारीचे चटके सहन करावे लागले. त्यातील काही कामगार एनएमएमटीमध्ये रुजू झाल्याने थोडासा दिलासा मिळाला. दीड हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्यहक्कांसाठी कामगार नेते श्याम म्हात्रे व सुरेश म्हात्रे यांनी विखुरलेल्या व मानसिकदृष्टय़ा खचलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा संघर्षांसाठी उभे केले. त्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शंभर चौरस फूट क्षेत्रफळाची जागा व्यापार, व्यवसायासाठी देण्यात यावी असा निर्णय घेतला. त्याचा सिडकोने रीतसर प्रस्ताव तयार करून संचालक मंडळात मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे एक हजार ५८७ कर्मचाऱ्यांना हे व्यवसायिक गाळे मिळणार असून, ६३१ कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रॅच्युईटीचे शिल्लक पैसे दिले जाणार आहेत. याशिवाय नामसाधम्र्यामुळे भाविष्य निर्वाह निधी (पीएफ)च्या पैशाची फेरफार झाली आहे. त्याची चौकशी करून तोही निधी तत्परतेने योग्य त्या कर्मचाऱ्याला देण्याची तयारी सिडकोने दर्शवली आहे. बीएमटीसीच्या या संर्घषात अनेक कर्मचारी स्वर्गवासी झाले आहेत. त्याच्या नातेवाईकांना या भरपाईचा फायदा मिळणार आहे. नवी मुंबईत आज शंभर चौरस फुटाचा गाळाही लाखो रुपये किमतीचा आहे. त्याचप्रमाणे ग्रॅच्युईटी व पीफ मिळणार असल्याने या कर्मचाऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

बीएमटीसीचे कर्मचारीही सिडकोचाच एक भाग होता. राज्य शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने पावले उचललेली आहेत. सिडकोला केवळ त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ही नुकसान भरपाई एकाच वेळी द्या अशी या कर्मचाऱ्यांच्या नेत्यांची भूमिका होती. त्याऐवजी शासकीय मदत ज्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे त्यांनी ती पदरात पाडून घ्यावी, अशी भूमिका आज मांडण्यात आली. ती त्यांना मान्य असल्याने ही प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे.
राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको