उरणमध्ये रविवारी सकाळी ९ वाजता शहरातील गणपती चौकात जागतिक चिमणी दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येकाने पक्ष्यांना पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी दाणे ठेवण्याचे आवाहन केले जाणार आहे. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व अन्न देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे वाटप केले जाणार आहे.
सध्या गोष्टीतल्या चिऊ, काऊंची घरे नामशेष होऊ लागली आहेत. तर अनेक ठिकाणी चिमण्याच गायब झाल्या आहेत. निसर्गातील हालचाली पाऊस यांची पहिली चाहूल या पक्ष्यांना लागते. त्यांच्या हालचाल, आवाजावरून अनेक वर्षे अंदाज बांधले जात होते. सध्या सिमेंटच्या जंगलात चिमण्यांची चिव चिव कमी होऊन त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. तर गावा गावातील पेंढय़ाची तसेच कौलारू छप्पर असलेली घरेही इतिहासजमा होऊ लागली आहेत. निसर्गातील बदलाचे परिणाम मोठय़ा प्रमाणात पक्षी आणि प्राण्यांवर होऊ लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे व सपाट होणाऱ्या डोंगर व त्यावरील झाडे यांमुळे पक्ष्यां चा अधिवास नष्ट झाला आहे. पतंगाच्या मांज्यामुळे शेकडो पक्षी जखमी होत असून त्यांचे पंखच निकामी होत आहेत. यात काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे पक्ष्यांचे निसर्गातील व मानवी जीवनातील स्थान टिकविण्यासाठी चिमणी दिनी प्रत्येकाने आपल्या घराशेजारी मोकळ्या जागेत ‘फ्रेन्ड्स ऑफ नेचर’ या निसर्गप्रेमी संघटनेने तयार केलेल्या घरटय़ांचा वापर करून पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करण्याचे आवाहन अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी केले आहे. दोन वर्षांपासून जंगलातील घटत्या जलस्रोतांच्या जागी पाण्याची व्यवस्था केली जात आहे.