अनुदानाचा प्रस्ताव तीन वर्षे लाल फितीत; महापौरांचे आश्वासन हवेत

तब्बल २५ वर्षांनंतर नवी मुंबई महापालिकेने शहरातील कुस्तीगिरांना आखाडा उपलब्ध करून दिला असला, तरी त्यात मॅटची सुविधा देण्यात न आल्यामुळे शहरातील कुस्तीवर चितपट होण्याची वेळ आली आहे. फुटबॉल, क्रिकेटसाठी कोटय़वधींचा निधी देणाऱ्या पालिकेने मॅटच्या प्रस्तावाकडे मात्र तीन वर्षे दुर्लक्ष केले आहे.

१५ मे २०१८ रोजी सानपाडा सेक्टर २ येथे कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी महापौर जयवंत सुतार यांनी स्पर्धात्मक कुस्तीसाठी मॅटची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले, परंतु ऑगस्टअखेरीस विविध शालेय कुस्ती स्पर्धाना सुरुवात होत असताना, नवी मुंबईतील कुस्तीगिरांसाठी मात्र अद्याप मॅटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना मातीतच सराव करावा लागत आहे. मॅटसाठी शासनाचे अनुदान मिळवण्याचा प्रस्तावही तीन वर्षांपासून शासनाच्या लाल फितीत धूळ खात पडला आहे.

नवी मुंबईत अनेक वर्षे कुस्ती आखाडा नसल्याने वाशीत ट्रक टर्मिनलच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपातील आखाडय़ात कुस्तीपटू सराव करत.

सततच्या पाठपुराव्यानंतर २१ लाख ८५ हजार ४३३ रुपये खर्च करून आखाडा उभारण्यात आला. आता तिथे ऐरोलीपासून बेलापूपर्यंतचे खेळाडू येतात. त्यांचे मॅटअभावी नुकसान होत आहे.

ऑगस्टअखेरीस अंबरनाथ येथे शालेय स्पर्धा सुरू होत आहेत. शहराच्या विविध भागांतील शालेय स्पर्धा, त्यानंतर विभागीय स्पर्धा, नवी मुंबई महापालिकेसह विविध महानगरपालिकांच्या महापौर कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी त्यानंतर हिंदकेसरी अशा विविध स्पर्धाचा हंगाम ऑगस्टअखेरपासून सुरू होत आहे. कुस्तीमध्ये मातीतील सरावाबरोबरच मॅटवर स्पर्धात्मक कुस्त्या खेळवल्या जातात. त्यासाठी विविध आकाराच्या मॅट उपलब्ध असतात, परंतु स्पर्धासाठी आवश्यक असलेली मॅट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले होते, परंतु तीन महिन्यांनंतरही मॅट उपलब्ध झाली नाही.

राज्याच्या क्रीडा धोरण २०१२ नुसार क्रीडा साहित्य खरेदीसाठी आर्थिक साहाय्याअंतर्गत कुस्ती मॅट खरेदीसाठी शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाकडे नवी मुंबई महापालिका क्रीडा विभागाकडून पाच लाख अनुदान देण्याचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. तो जुलै २०१५ पासून लाल फितीत बंद आहे. त्यामुळे पालिकेने तात्काळ कुस्ती खेळाडूंना कुस्ती सरावासाठी मॅट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

नवी मुंबईतील कुस्ती खेळाडूंना आखाडय़ाअभावी कोल्हापूर, पुण्याला पाठवावे लागत होते. या खेळासाठी तालिम मिळाली याचा आनंद आहे. पालिकेने तात्काळ मॅट उपलब्ध करुन दिल्यास स्पर्धेसाठी मुलांना सराव करता येईल.

– कृष्णा रासकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते

सानपाडा येथील तालिम नवी मुंबई शहराची आहे. कुस्तीसाठी मॅटची व्यवस्था पालिकेने उपलब्ध करून द्यावी याबाबत महापौरांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे पालिकेकडून लवकरात लवकर कुस्तीसाठी मॅट उपलब्ध करुन देण्यात येईल.

– संदीप नाईक, आमदार