काम पूर्ण होऊनही वास्तू बंद; लवकर खुली करण्याची कुस्तीपटूंची मागणी

नवी मुंबई पालिकेत तब्बल २५ वर्षांनंतर साकार झालेला एकमेव कुस्ती आखाडा गेले सहा महिने उद्घाटनाविना पडून आहे. अपूर्ण स्थितीतील वास्तूंचे उद्घाटन केल्यानंतर त्या अनेक महिने अपूर्ण आणि वापराविना राहत असल्याच्या अनुभवातून यापुढे केवळ काम पूर्ण झालेल्या वास्तूंचेच उद्घाटन करण्यात येईल, असा संकल्प महापौर जयवंत सुतार यांनी सोडला आहे. कुस्ती आखाडय़ाचे काम पूर्ण झाले असल्याने त्याचे तरी उद्घाटन करा आणि खेळाडूंसाठी तो खुला करा, अशी मागणी कुस्तीपटू करू लागले आहेत.

महापालिकेने विविध सेवा-सुविधांसाठी उभारलेल्या वास्तूंचे श्रेय लाटण्यासाठी त्या अपूर्णावस्थेत असतानाच त्यांचे उद्घाटन केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशा वास्तू पुढे सोयी-सुविधांअभावी वापराविना राहतात आणि पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागते. हे टाळण्यासाठी अभियांत्रिकी विभागाने काम पूर्ण केल्याचा अहवाल दिल्यानंतरच वास्तूच्या उद्घाटनाची वेळ निश्चित करण्याचा नियम केला आहे. परंतु सानपाडय़ात सेक्टर २ येथील भूखंड क्रमांक १०वर पालिकेने बांधलेला पहिला कुस्ती आखाडा पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनाअभावी वापराविना आहे. हा आखाडा कधी खुला होणार असा प्रश्न कुस्तीपटूंना पडला आहे.

अनेक वास्तू शोभेपुरत्याच

नवी मुंबई महापालिकेत विधानसभा व पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अनेक वास्तूंच्या उद्घाटनांचा धडाका लावण्यात आला होता. कोटय़वधी रुपये खर्च करून नेरुळ, ऐरोली, बेलापूर येथे उभारलेल्या रुग्णालयांचे उद्घाटन झाले होते. परंतु त्या वेळी फक्त सार्वजनिक रुग्णालयांच्या ठिकाणीच बाह्य़रुग्णसेवा सुरू करण्यात आली होती. अनेक वर्षांनंतर अद्याप या इमारतींचे अनेक मजले वापराविना पडून आहेत. तिथे सेवा कधी मिळणार याची गोरगरीब रुग्णांना प्रतीक्षा आहे.

पालिकेच्या कोणत्याही वास्तूचे व नागरी सुविधेचे उद्घाटन करण्यापूर्वी काम १०० टक्के पूर्ण असल्याचा अहवाल अभियांत्रिकी विभागाने सादर केल्यानंतरच उद्घाटनासाठी तारीख वेळ निश्चित केली जाते. अर्थसंकल्प व त्यावरील चर्चा यात गेले काही दिवस वेळ गेला. त्यामुळे  आता लवकरात लवकर पालिकेच्या पहिल्या कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन करण्यात येईल.   – जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई</strong>