विकास महाडिक

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना रोगावर अद्याप कोणत्याही प्रकारचे औषध अथवा लसीचा शोध न लागल्याने प्रचलित उपचारांसह बरोबरच योगा प्राणायाम, समुपदेशन आणि आहार या त्रिसूत्रीचा वापर परिणामकारक ठरत असल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई पालिकेने वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या ‘कोविड’ रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोनाग्रस्तांसाठी या उपचाराची सोय देखील केली आहे. कोविडसारख्या साथीच्या आजाराबरोबर लढताना दमछाक होत असताना नवी मुंबई पालिकेने वापरलेली ही उपचारपद्धती  राज्यात पहिल्यांदाच अवलंबण्यात आल्याचे समजते.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या पावसाळ्यात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आरोग्य व्यवस्था उभारण्याचे काम सुरू आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने वाशी येथील सिडकोच्या प्र्दशन केंद्रात एक हजार ८२ खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरचित्र संवादाने हे रुग्णालयाचे  लोकार्पण करण्यात येणार आहे.

११८२ खाटांच्या या रुग्णालयात ५०० खाटांजवळ ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ५० पेक्षा जास्त डॉक्टर आणि २५० वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आले आहेत. साफसफाईसाठी ३५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या रुग्णालयात अद्यावत सुविधा रुग्णांना देण्यात येणार आहेत. रुग्णांना प्रदर्शनी केंद्रात शिजवलेले गरम जेवना बरोबरच पिण्यासाठी २४ तास गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या अत्यावश्यक वैद्यकिय सुविद्या बरोबरच योगा, प्राणायम, मानोपसचार तज्ञ,  पुस्तकालय आणि आहारतज्ञाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी वेगळे कक्ष तयार करण्यात आले आहे. रुग्ण हे रोगप्रतिकार शक्ती  आणि सकारात्मक दृष्टीकोनामुळे बरे होत असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या संकल्पनेतून या रुग्णालयात उपचारांबरोबरच मानसिक बळ वाढविणाऱ्या या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. भीतीने अनेक रुग्णांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना सावरण्यासाठी तज्ज्ञ डॉ. वरुण समुपदेशन करतील.

रुग्णांसाठी पुस्तकांचीही सोबत

करोनाग्रस्त रुग्णांची मानसिक स्थिती सातत्याने विचार केल्याने अथवा बातम्या एकून बिघडत असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई पालिकेने सीएसआरद्वारे काही वेगळे प्रयोग या रुग्णालयात करण्याचे ठरविले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पॉझिटिव्ह विभागात एक कोपरा पुस्तकांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रेरणादायी असलेली २०० पुस्तके ठेवली जाणार आहेत.