नवरात्रोत्सवानिमित्त नवी मुंबईतील गावदेवी, दुर्गामाता तसेच देवींच्या अन्य मंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागली आहे. अनेक सार्वजनिक मंडळांनी देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असून तेथेही दर्शनासाठी व सजावट पाहण्यासाठी भक्तांची गर्दी आहे. नवी मुंबईत नेरुळची गावदेवी माता, वाशीची मरआई माता, सीबीडीची सप्तशृंगी माता, तुभ्र्यातील रामतून माता, सीबीडी येथील गोवर्धनी माता आदी मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव सुरू आहे.
तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या दांडियालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रंगीबेंरगी चनिया-चोली, लहेंगा अन्य पारंपरिक वस्त्रे परिधान केलेले तरुण-तरुणी दांडियात रंग भरत आहेत. गुजराती, मराठी गाणी तसेच उडत्या चालीच्या हिंदी गीतांच्या तालावर तरुणांचे पाय थिरकत आहेत. यंदा यामध्ये सेल्फीची भर पडली आहे. दांडिया खेळायला आलेली तरुणाई सेल्फी काढताना दिसत असून कोणी वैयक्तिक तर कोणी ग्रुप सेल्फी काढत आहे.