26 March 2019

News Flash

जुईनगरमध्ये बेपर्वाईचा बळी

नेरुळ सेक्टर २१ येथील कृष्ण कमल सोसायटीत राहणारा मुदस्सीर सिव्हिल इंजिनीअर होता.

नेरुळ सेक्टर २१ येथील कृष्ण कमल सोसायटीत राहणारा मुदस्सीर सिव्हिल इंजिनीअर होता.

पुलाच्या सांध्यातील अंतराकडे दुर्लक्ष; सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल

शीव-पनवेल महामार्गावरील जुई नगर येथील उड्डाणपुलाच्या सांध्याच्या निघालेल्या पट्टय़ांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले दुर्लक्ष प्रवाशांना भलतेच महागात पडत आहे. अनेक वाहनांचे अपघात झाल्यानंतरही दुरुस्ती न झाल्याने नेरुळ येथील एका तरुणाचा येथे नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पामबीच उड्डाणपुलानजीकच असलेल्या या जुई नगर पुलावरील सांध्याची पट्टी निखळल्यामुळे झालेल्या अपघातांत जुईनगरमधील एकाच सोसायटीतील गणेश पुजारी आणि जयेश सोळंकी हे दोन तरुण जखमी झाले होते. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त ७ फेब्रुवारी २०१८ला प्रसिद्ध केले होते. तरीही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. प्रसारण सांध्यातील दोषामुळे शनिवारी याच ठिकाणी वाहन घसरून २६ वर्षीय मुदस्सीर नागरबावडी याचा मृत्यू झाला. नेरुळ सेक्टर २१ येथील कृष्ण कमल सोसायटीत राहणारा मुदस्सीर सिव्हिल इंजिनीअर होता. मुदस्सीर ज्या भरधाव डंपरखाली सापडला त्या डंपरचा चालक मुन्ना श्रीपाद बिंद याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसरण सांध्यामधील अंतर धोकादायक ठरत आहे. दुचाकीचे टायर अडकून अपघात होतात. आजवर येथे सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी रहिवासी करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एस. पी. श्रावगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दररोज लाखो वाहने जाणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे वारंवार बंद पडातात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली.

जुई पुलाजवळ पुलाच्या जोडणीच्या ठिकाणी लोखंडी पट्टय़ावर खाली-वर झाल्या आहेत.त्यामुळे दुचाकीचे टायर अडकून तोल जातो आणि अपघात होतात. माझाही येथे अपघात झाला होता, सुदैवाने मागून भरधाव वाहन येत नव्हते, त्यामुळे मी वाचलो. परंतु अपघात झाल्याने माझ्या पायाला दुखापत झाली आहे, शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरुणाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करून कडक शिक्षा ठोठावली जावी.

 – गणेश पुजारी, सुयोग सोसायटी, जुईनगर

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती केली तरच अपघात थांबतील. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.

– सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक मुदस्सीर नागरबावडी

First Published on March 13, 2018 3:10 am

Web Title: youth died in road accident at juinagar flyover