विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात सुरू केलेली वायफाय सेवा ठप्प झाल्याने तरुणांमध्ये नाराजीची भावना आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने येथील तरुणाईला मोफत वायफाय सुविधा मिळावी, या हेतूने सुरू झालेली ही योजना जेमतेम वर्षभर टिकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नेरुळ, वाशी, कोपरखरणे व ऐरोली रेल्वे स्थानकांत मोफत वायफाय सेवा सुरू केली होती. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्थानकांबाहेर फलकबाजी करून या सेवेचा शुभांरभ करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी संपूर्ण नवी मुंबई शहरात वायफायचे जाळे निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र उद्घाटन केल्यांनतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांनंतर टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या. या सेवेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच कोपरखरणे, ऐरोली, वाशी येथील वायफाय सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्याची नागरिकांची ओरड आहे.
सायबरनेटीक आणि डब्ल्यू नेट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्याने सध्या वायफायचा टॉवर अडगळीत पडला आहे. या सेवेचा लाभ प्रामुख्याने तरुण मुले-मुली घेताना दिसत होती. या पाश्र्वभूमीवर ठप्प झालेल्या या सेवेमुळे तरुणाईमध्ये मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे.
एखादी योजना सातत्याने चालवता येत नसेल तर ती सुरू करण्यापूर्वी विचार करायला हवा होता, अशा शब्दांत विरोधी पक्षाने टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला.

वायफाय सेवा काही तांत्रिक बाबींमुळे बंद झाली आहे. याबाबत माहिती घेऊन ती पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने म्हणून मी प्रयत्न करेन.
संदीप नाईक., आमदार