03 December 2020

News Flash

जेएनपीटीत निर्यातीसाठी आलेल्या कंटेनरमध्ये तरूण!

या कंटेनरमध्ये माल भरणाऱ्या कामगारांपैकी हा एक कामगार असल्याचे समजते.

(संग्रहित छायाचित्र)

चौकशी सुरु; कामगार असल्याचा प्राथमिक अंदाज

जेएनपीटीतील डीपी वर्ल्ड या खासगी बंदरातून अमेरिकेतील न्यूयॉर्क बंदरात एका कंपनीचा निर्यात माल घेऊन निघालेला कंटेनर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता बंदराच्या गेटवर आला असता  कंटेनरमध्ये साबीर अहमद (२२) हा तरुण आढळला. बंदरातील सीमा शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांकडून या तरुणाची कसून चौकशी सुरू आहे. यात कोणता घातपाताचा प्रकार आहे का याचाही तपास सुरू आहे.

बंदरातून मालाची निर्यात करण्यासाठी मीरारोड येथील कवीश फॅशन या कंपनीचा माल भरलेला कंटेनर डीपी वर्ल्ड बंदरात आला होता. नियमानुसार डीपी वर्ल्ड बंदराच्या मुख्य प्रवेशद्वारात कंटनेर जाण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. ही तपासणी सुरू असताना कंटेनरच्या आतून कंटेनर ठोकत असल्याचा आवाज येथील कामगारांना आला. त्यांनी तातडीने सीमा शुल्क विभाग तसेच पोलिसांशी संपर्क साधून कंटेनर उघडला. त्या वेळी हा तरुण या कंटेनरमध्ये होता. मीरारोड येथील कंपनीच्या गोदामातून हा कंटेनर माल भरून रात्री निघाला होता.

या कंटेनरमध्ये माल भरणाऱ्या कामगारांपैकी हा एक कामगार असल्याचे समजते. मात्र कंपनीतून माल निर्यातीसाठी पाठविला जात असताना सीमा शुल्क विभागाच्या एक्साइज विभागाकडून तपासणी केली जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे कंटेनर सील करीत असताना या विभागाने तसेच व्यवस्थापनाने त्यात माणूस असल्याची खात्री झाली नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे जर वेळेत या तरुणाने बंदराच्या प्रवेशद्वाराच्या तपासणी नाक्यावर कंटेनर ठोठावला नसता तर तो थेट अमेरिकेत पोहोचला असता. तसेच कंपनी व्यवस्थापन, सीमा शुल्क विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे बंदरातील मालाच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:31 am

Web Title: youth found in jnpt export truck
Next Stories
1 ‘पर्ससिन’ मासेमारीसाठी दहा अटींचे जाळे
2 पालिका विरुद्ध प्रकल्पग्रस्त 
3 डेंग्यू, मलेरिया, काविळीचे थैमान
Just Now!
X