एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोपरखरणे येथे घडली असून सोमन्ना पुजारी असे या  तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोरपरखरणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

खासगी कारचालक असणारा सोमन्ना हा कोपरखरणे सेक्टर-१ येथे मित्रांसोबत भाडय़ाच्या खोलीत राहत होता. बुधवारी संध्याकाळी एकटा असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री मित्र घरी परतले असता दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकीतून उघडून बघितले असता सोमन्नाचा मृतदेह पंख्याला लटकलेला त्यांना दिसला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. सोमन्नाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन चिठ्ठय़ा पोलिसांच्या हाती लागल्या. आपण असफल प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या करीत असून यासाठी कोणालाही दोषी धरू नये, असे त्याने त्यात लिहिले आहे.

पत्नीवर हल्ला करणाऱ्याला अटक

पत्नीच्या चेहऱ्यावर ब्लेडचे वार करणाऱ्या राजू मगरे या तरुणाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. रबाळे एमआयडसीतील तलावाजवळ राहणाऱ्या राजूने पत्नी अनिता हिच्या चेहऱ्यावर तसेच हातावर ब्लेडचे वार केले. यामुळे जखमी झालेल्या अनिताला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजू मगरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.