दोन महिन्यानंतर १८ ते ३० वयोगटासाठी आज पहिली मात्रा

प्रतिनिधी : लस तुटवडय़ामुळे गेली दोन महिने १८ ते ३० वयोगटातील नागरिकांना नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणारे मोफत लसीकरण बंद होते. त्यामुळे त्यांना लस प्रतीक्षा होती. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाने बुधवारी लसीकरण आयोजित केले आहे. पालिकेच्या ८३ केंद्रांवर हे लसीकरण होणार असून यासाठी १७,५०० लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला, तर १ मे या महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. परंतु लस तुटवडय़ाअभावी शहरात मागील अनेक दिवसांपासून लसीकरण मोहीम विस्कळीत झाली होत आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुणाईला दोन महिन्यानंतर प्रथमच कोविशिल्डचे फक्त पहिल्या मात्रेचे लसीकरण होणार आहे.

दरम्यान शहरातील १८ ते ४४ वयोगटोतील नागरिकांना

आतापर्यंत पहिली मात्रा ४ लाख ९६ हजार ९९६ जणांना तर दुसरी मात्रा ८७ हजार २६२ जणांना देण्यात आली आहे. जर पालिकेकडून या गटासाठी लसीकरण होत नव्हते तर एवढय़ा लसमात्रा कुठून देण्यात आल्या असा प्रश्न तरुणाईकडून उपस्थित होत आहे. मोफत लसीकरणासाठी पालिकेने या वयोगटातील नागरिकांना प्रतीक्षेत ठेवल्याने अनेकांनी सशुल्क लसीकरण करून घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे नागरिक खासगी रुग्णालयात जाऊन पैसे देऊन लस घेत असल्याचे चित्र आहे. शासनाकडून होणाऱ्या लसीकरणातील अनियमिततेमुळे नागरिकांचे हाल होत असून त्याचा सर्वाधिक फटका १८- ३० वयोगटाला बसला आहे. महापालिकेला सोमवारी उशिरा कोविशिल्ड लशींचे २० हजार ५५० तर कोव्हॅक्सिन लसींचे २ हजार १६० लस मिळाल्या आहेत. त्यातून बुधवारी प्रशासनाने १८ ते ३० वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आयोजित केले आहे.