गृहनिर्माण सोसायटींच्या सहभागासाठी पनवेल पालिका आयुक्तांचे प्रयत्न

घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामध्ये पनवेल पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बडय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांपैकी अद्याप पाच टक्क्यांहून कमी सोसायटय़ांनी सहभाग नोंदविला असल्याने पालिका प्रशासनाने सर्वच सोसायटय़ांमधील रहिवाशांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केले तरच शहरात घनकचरा व्यवस्थापन शक्य असल्याचे मत पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रामध्ये साडेतीनशेहून अधिक टन ओला व सुका कचरा जमा होतो. यासाठी पालिकेला घरोघरी जाऊन कचरा जमा करणे, कचराकुंडीमधून कचऱ्याची वाहतूक करून तो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी वर्षांला २० कोटी रुपये खर्च येतो. मात्र राज्य सरकारने आता दिवसाला शंभर किलोहून अधिक कचरा जमा होणाऱ्या गृहनिर्माण सोसायटय़ांना किंवा ५ हजार चौरस मीटरहून अधिकच्या जागेवर असणाऱ्या गृहसंकुलांना स्वत:च कचऱ्याचे विघटन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सभागृह, मॉल यांच्यासह बडय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांना स्वत:च्या सोसायटीच्या आवारातच या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे.

कचऱ्यापासून निर्माण होणारी खते बनविणे, बायोगॅस बनविणे अशा पद्धतीने कचऱ्यापासून विविध निर्मिती हे पालिकेचे ध्येय आहे. सध्या पालिकेचे अडीच लाखांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. पालिकेने अद्याप किती गृहनिर्माण सोसायटय़ा आहेत, याचे सर्वेक्षण केलेले नाही. तसेच बडय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा वगळता लहान सोसायटी व चाळींमध्ये ही योजना यशस्वी करण्यासाठी कचरा व्यवस्थापन व नागरिकांची साक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी कचरावेचक महिला व बचत गटांतील महिलांची मदत घेतली जाणार आहे.

पालिका क्षेत्रामध्ये कचरा वाहतूक करणारे मजूर न येणे, सफाई कामगार कामावर न येणे या समस्येमुळे प्रशासन हैराण आहे. त्यामुळे वसाहती अस्वच्छ असून ओला व सुका कचऱ्याचे घरातच वर्गीकरण कसे करावे, यासाठी पालिका साक्षरता मोहीम राबविणार आहे. यासाठी काही सामाजिक संस्था, महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचीदेखील मदत घेतली जाणार आहे.

– डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल पालिका.