पनवेल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोटय़धीश रिंगणात

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पाचवी उत्तीर्णापासून पदवीधर व डॉक्टरांपर्यंत अनेक जण नशीब अजमावत आहेत. एक वकील, एक डॉक्टर, सात पदवीधर, १७ बारावी उत्तीर्ण व १२ दहावी उत्तीर्ण रिंगणात आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी २३ उमेदवार व पंचायत समितींच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार विविध राजकीय पक्षांच्या चिन्हासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. पंचायत समितीच्या आपटे मतदारसंघामध्ये दोन्ही पदवीधर महिला उमेदवार आणि गुळसुंदे मतदारसंघामध्ये डॉक्टर उमेदवारांविरुद्ध पदवीधर उमेदवार आमनेसामने आहेत. वहाळ मतदारसंघामध्ये अल्पशिक्षित उमेदवार एकमेकांसमोर आहेत. पालीदेवद मतदारसंघामध्ये सुशिक्षित उमेदवार एकमेकांचे स्पर्धक बनले आहेत. चार अशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

३१ कोटय़धीश

३१ उमेदवार हे कोटय़धीश आहेत. त्यांच्याकडे १ कोटीहून अधिक संपत्ती आहे. शेकापच्या पळस्पे येथील राजेश्री भोपी यांच्याकडे तब्बल ५८ कोटी रुपयांची संपत्ती, तर काँग्रेसचे पळस्पे येथील भारत म्हात्रे यांच्याकडे २२ कोटीहून अधिक संपत्ती आहे. पालीदेवद येथील शेकापचे सुनील सोनावळे यांच्याकडे १४ कोटींची संपत्ती तर विचुंबे येथील शेकापच्या प्रणाली भोईर यांच्याकडे १३ कोटींची मालमत्ता आहे. विचुंबेच्या भाजपच्या नीलम भिंगारकर यांच्याकडे ९ कोटींची मालमत्ता आहे. पळस्पेच्या लीना पाटील, पोयंजेचे वसंत काठावळे, गुळसुंदे येथील विनोद साबळे, गव्हाणचे हेमंत ठाकूर या चारही उमेदवारांची संपत्ती पाच कोटींहून अधिक आहे.

आरोपीही रिंगणात

मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणारे भाजपचे विनोद साबळे हे गुळसुंदे मतदारसंघात आपले नशीब अजमावत आहेत. त्यांच्यावर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे हेमंत ठाकूर यांच्यावर चोरीसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेले भाजपसह शेकाप व सेनेचे ९ उमेदवार या निवडणुकीत मतांचा जोगवा मागत आहेत.