पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांंनी छपरावरील कौल काढून घरात प्रवेश करत १५ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागीने चोरले आहेत. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील चक्की व दुधाचा व्यवसाय करणा-या व्यापा-याच्या घरात ही चोरी झाली.

हेही वाचा- लोकलच्या डब्यात आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

स्वयंपाक घरात संबंधित व्यापा-याने कपाटामध्ये गणेशोत्सवात वापरलेले दागिने ठेवले होते. तसेच कपाटात सव्वा लाखांची रोकडही होती. चोरट्यांनी दागिन्यांसह रोकडही लंपास केली. या चोरीच्या घटनेनंतर ग्रामीण पनवेलमधील ग्रामस्थ धास्तावले आहेत. रात्रीच्यावेळी अनोळखी व्यक्तींविषयी विशेष खबरदारी ग्रामस्थ घेत आहेत. या चोरीच्या घटनेनंतर ग्रामीण भागात पोलिसांनी यावेळेत गस्त घालावी अशी मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वी कामोठे येथे मंदीरातील दानपेटी आणि सराफाचे दूकान लुटल्याच्या घटनेमुळे पनवेलमध्ये चोरांची दहशत वाढल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे नूकतेच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सींह यांनी पनवेलमध्ये साडेचार लाख रुपयांचे विविध गुन्ह्यात चोरलेले दागिने आणि वस्तू पीडितांना परत दिले होते. मात्र, आता पुन्हा वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.