कागपत्रांची पूर्तता न केल्यास परवाना रद्द होणार, उपप्रादेशिक परिवहन विभागाचा इशारा

नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि टॅक्सीवाल्यांनी नव्या नियमांचे पालन न केल्यास आगामी शैक्षणिक वर्षांत त्यांच्यावर दंडात्मक किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. वाहनांच्या खिडक्यांना सरंक्षक जाळी नसणे, परवाना नसताना विद्यार्थी वाहतूक करणे, बसमध्ये महिला साहाय्यक नसणे अशा त्रुटी आढळल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द केला जाणार आहे.

जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. त्यामुळे येत्या १५-२० दिवसांत आरटीओच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी बसमालकांना धावपळ करावी लागणार आहे. नवी मुंबईत २०१६ मध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १ हजार १०१ शालेय बसगाडय़ांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यांच्याकडून ३ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, वाशी, नेरुळ, तुभ्रे, बेलापूर अशा आठ नोडमध्ये अनेक शाळा आहेत. लाखो रुपये शुल्क आकारणाऱ्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या सोयीसाठी बसगाडय़ा सुरू केल्या आहेत.

नवी मुंबईमध्ये २०१६ पर्यंतच्या नोंदणीनुसार १ हजार ४३७ बस आहेत. गेल्या वर्षांत शालेय बसच्या अपघातांचे वाढलेले प्रमाण पाहता आरटीओने यंदा या बससंदर्भातील नियमांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

असे आहेत नियम

आरटीओच्या नियमांनुसार या बस गाडय़ांना पिवळा रंग देणे बंधनकारक आहे. वाहनचालकांला ५ वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र आणि कोणताही अपघात होऊ नये यासाठी संपूर्ण बसेसच्या खिडकीला सुरक्षा जाळी बसवणे. त्याचबरोबर महिला साहाय्यक प्रत्येक बसमध्ये तैनात करणे. शालेय व्यवस्थापन आणि पालक संघटना यांची नियोजन समिती तयार करणे. अशा दहांपेक्षा अधिक अटी आरटीओ ने सक्तीच्या केल्या आहे. यासाठी माहिती पुस्तिकादेखील तयार केली आहे.

chart

,१०१ बस गाडय़ांना आरटीओची नोटीस

मागील वर्षभरामध्ये १ हजार २१७ बसेसची तपासणी करण्यात आली. तर तपासणीसाठी कार्यालयात बोलवनूही २२० शाळा बस कार्यालयात आणण्यात आल्या नाहीत. १ हजार ४३७ बसपैकी नियम न पाळणाऱ्या १ हजार १०१ बसना आरटीओने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या बसची संख्या ३२ आहे. मागील वर्षांची आकडेवारी पाहता परवाना निलंबित करण्याची कारवाई आरटीओने केली नाही, मात्र त्यांच्याकडून ३६ लाख रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. परवाना रद्द करण्याची कारवाईला रोखण्यासाठी शाळा प्रशासनालाही आरटीओच्या दारी जावे लागणार आहे.

नवी मुंबईतील शालेय वाहतुकीच्या नियमावलीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शालेय समन्वय समिती, पालक संघटना व बसचालक, कंत्राटदार यांच्याशी शालेय सत्र सुरू झाल्यांनतर जून महिन्यात एक बैठक घेण्यात येईल. चर्चासत्रात व जनजागृती करण्यात येईल. आरटीओच्या नियमांनुसार तपासणी करत असताना कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाणार आहे.

संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई