नवी मुंबई : पनवेल पालिका क्षेत्रात मालमत्ता करवसुलीवरून रणकंदन सुरू असताना नवी मुंबई पालिका मात्र यंदा सहाशे कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. बुधवापर्यंत ४७० कोटी रुपये वसुली झाली आहे. येत्या सात दिवसात १३० कोटी रुपयांची वसुली करण्याचा पालिकेचा मालमत्ता कर विभाग प्रयत्न करीत आहे.

मात्र टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु मध्यम उद्योजक आडमुठेपणाची भूमिका घेत असून थकबाकीतील मूळ रक्कम देखील भरण्यास तयार होत नाहीत. मागील पंधरा वर्षांतील ही थकबाकी दोन हजार तीनशे कोटी रुपये आहे. पालिकेने पुढील वर्षांचे लक्ष्य  ८०० कोटी रुपये ठेवले आहे. त्यासाठी यंदा ६०० कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करण्याचे  जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस

नवी मुंबई पालिकेचे जीएसटी परतावा व मालमत्ता कर हे उत्पन्नाचे दोन प्रमुख स्रोत  आहेत. जीएसटीमधून पालिकेला दरवर्षी १३०० ते १४०० कोटी रुपये शासनाकडून परतावा मिळत आहे. त्यामुळे मालमत्ता करातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी लीडार पध्दतीने शहरातील सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असून या ड्रोन सर्वेक्षणाला नुकतीच केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणानंतर पालिकेच्या मालमत्ता करातून उत्पन्नात वाढ होणार आहे.मागील तीस वर्षांत करण्यात आलेल्या मानवी सर्वेक्षणातून पालिकेने सव्वातीन लाख मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. या मालमत्ता करातून यंदा मार्चअखेर पर्यंत ५५० ते ६०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे. बुधवारी हे लक्ष्य ४७० कोटीपर्यंत पूर्ण करण्यात आले असून येत्या सात दिवसात  आणखी १३० कोटी रुपयांची वसुली करणार आहे.

पालिकेच्या हद्दीत पाच हजारांपेक्षा जास्त लहान मोठे उद्योगधंदे आहेत. त्यांच्याकडे मालमत्ता कराची २३०० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यासाठी पालिकेने अभय योजना देखील लागू केली आहे. काही उद्योजकांनी या अभय योजनेला प्रतिसाद दिल्याने ७० कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहेत.न्यायालयाने उद्योजकांवर कोणतीही कारवाई न करता मालमत्ता कर वसूल करण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पालिका या उद्योजकांवर कोणतीही कारवाई न करता गोडीगुलाबीने जेवढी मालमत्ता करवसुली करता येईल तेवढी करीत आहे. त्यामुळे काही थकबाकीदार कारखानदारांनी मार्च अखेपर्यंत ही थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे. त्या आशेवर पालिका सहाशे कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य  ठेवत आहे. यंदा होणारी मालमत्ता करवसुली ही मागील तीन वर्षांपेक्षा जास्त असणार हे स्पष्ट दिसून येत आहे.

मार्च अखेपर्यंत निश्चित करण्यात आलेले लक्ष्य गाठण्याचा पूर्णपणे प्रयत्न  केला जात आहे. त्यासाठी एमआयडीसी भागात गेली अनेक वर्षे थकबाकी केलेल्या उद्योजकांना आवाहन केले जात आहे. त्यांनी किमान मुद्दल रक्कम भरण्याचा आग्रह केला जात आहे. गेले अनेक दिवस योग्य दिशेने राबविण्यात येत असलेल्या करवसुली नियोजनामुळे आतापर्यंत ४७० कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आले असून मार्चअखेपर्यंत सहाशे कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करण्याचा पालिकेचा निर्धार आहे.  -सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका