शुल्क न भरल्याने १४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले

राज्य शासनाने शालेय शुल्काबाबत गेल्या वर्षी ठोस भूमिका न घेतल्याने खासगी शाळांकडून मनमानी सुरू झाली आहे.

शाळा सोडल्याचे पालकांना ऑनलाइन दाखले; खारघरमधील विश्वज्योत शाळेतील प्रकार

पनवेल : राज्य शासनाने शालेय शुल्काबाबत गेल्या वर्षी ठोस भूमिका न घेतल्याने खासगी शाळांकडून मनमानी सुरू झाली आहे. खारघर येथील विश्वज्योत शाळा प्रशासनाने तर गेल्या वर्षीचे शुल्क न भरल्याने १४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेने ऑनलाइन शाळा सोडल्याचे दाखले पाठवले आहेत.

करोना काळात अनेकांचे रोजगार गेले, उद्योग-व्यवसाय ठप्प झाले असताना खारघरमधील शाळा व्यवस्थापनाने २०१८ पासून २५ टक्के शिक्षण शुल्क वाढविल्याने अनेक पालकांनी हे शुल्क भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे थकीत शिक्षण शुल्क न भरल्याने शाळा व्यवस्थापनाने थेट विद्यार्थ्यांना शाळेतून काढले आहे. यामुळे संतापलेल्या पालकांनी विचारणा करण्यासाठी शाळा गाठली, मात्र आधी शुल्क भरा नंतरच चर्चा करू असे शाळा व्यवस्थापनाने भूमिका घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. शाळेने पालकांना मंगळवारी शाळेतही प्रवेश नाकारला. त्यामुळे अखेर हताश पालकांनी विविध सरकारी प्रशासनाकडे  तक्रार करण्यासाठी धाव घेतली.

खारघर येथील सेक्टर २० मधील विश्वज्योत विद्यालयाच्या व्यवस्थापनाने करोनाकाळात शिक्षकांचे वेतन व इतर खर्च भागविण्यासाठी थकीत शिक्षण शुल्क वसूल करण्यासाठी कठोर धोरण अवलंबले आहे. याचे पडसाद मागील आठवडय़ापासून उमटत आहेत.

शासनाने शैक्षणिक संस्थांना सक्तीच्या वसुलीपेक्षा शिक्षणासाठी सवलतीचे धोरण आखण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी शाळा व्यवस्थापनांकडून या सूचनांना केराची टोपली दाखवली जात आहे. या शाळेतील तिसरी इयत्तेमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क हे ६० हजार रुपये होते, दोन वर्षांनंतर संबंधित पाल्य पाचवीत प्रवेश झाल्यावर शाळा व्यवस्थापनत्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ८४ हजार रुपये वाढीव शुल्क मागत आहे. पालक २०१८ प्रमाणे ६० हजार रुपये भरण्यास तयार आहेत. मात्र शाळा व्यवस्थापन ‘अगोदर वाढीव शुल्कासहीत शुल्क भरा, नंतरच पुन्हा प्रवेशप्रक्रिया करू’ अशी भूमिका घेतल्याने पालक संतप्त झाले आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता गंभीर यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या प्रकाराची माहिती घेण्यासाठी मंगळवारी पनवेल पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना विचारणा केली. कोणताही राजकीय पक्ष अद्याप या पालकांच्या समर्थनार्थ उभा राहिला नसल्याने या पालकांनी पनवेलच्या गटशिक्षण अधिकारी व अलिबाग येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेच्या या वर्तणुकीविषयी तक्रार दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 14 students expelled school non payment fees akp

ताज्या बातम्या