scorecardresearch

नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा पुन्हा समावेश ; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ही गावे पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली.

मुंबई : काही वर्षांपूर्वी जनआंदोलनामुळे वगळण्यात आलेल्या निघू, मोकाशी, वालीवली, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बामाली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे, दहिसर या १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

प्रमोद पाटील, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, डॉ. बालाजी किणीकर आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून ही १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी करीत असून सरकारने त्यांचा निर्णय घेण्याचा आग्रह धरला. ठाणे महानगरपालिकेलगत असलेली ही गावे अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. मात्र त्या वेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे सन २००७ मध्ये ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी दूर करून त्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ही गावे पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास विभाग सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सद्य:स्थितीत निवडणुकांची प्रभागरचना निश्चित झाली असून, जनगणना सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच या गावामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सहा कोटी रुपयांची आवश्यकता असून गावठाणातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी ५९१ कोटींची गरज असल्याचे सांगितले. मात्र सदस्यांच्या आग्रहानंतर या गावांचा पालिकेत समावेश करण्याची घोषणा करीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शिंदे यांनी विभागास दिले. या गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश केल्यानंतर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता ठरवून टप्प्याटप्प्याने निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 villages re included in navi mumbai municipal corporation zws