नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून संपूर्ण शहरावर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे .मेसर्स टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांच्याकडून शहरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असून पोलिसांसमवेत साईड सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे सध्या शहरात २८२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु शहरातील सर्वच विभागात महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका जवळजवळ १५० कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पद्धतीने शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या हद्दीतील महत्त्वाची निवडक ठिकाणी तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी पालिकेने २०१२ रोजी २८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आता शहरात १५०० अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून लालाफितीत व दरांवरून कोलांटउडय़ा घेत होता.
नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली मुलुंड उड्डाणपूल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारावर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहे. शहराच्या प्रत्येक प्रवेश-निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने नंबर प्लेट वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ८ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरात जवळजवळ १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून या कामासाठीचा कार्यादेश दिला आहे. त्यानुसार पोलिसांसमवेत सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले असून आता त्यापुढील तांत्रिक व इतर सर्वच कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुढील ९ महिन्यांत संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. -शिरीष आरदवाड, सहशहर अभियंता

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण काम होणार आहे. शहरात वाहतूक व पोलीस विभागाला या सुविधेचा अत्यंत फायदा होणार आहे. – पुरुषोत्तम कऱ्हाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग