आरोपीला चोवीस तासांत अटक

नवी मुंबई</strong> : माणुसकीच्या नात्याने गरज असल्याने एका महिलेला पोटभाडेकरू म्हणून ठेवले. तिने कुटुंबीयांचा विश्वास संपादन करीत ते घरात नसताना घरातील ७ लाख ८४ हजारांचा ऐवज लंपास केला. यात १७ तोळ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून चोरी केलेले दागिने जप्त केले आहेत. सिद्धी ऊर्फ स्वाती नरेंद्रकुमार वैद्य ऊर्फ सारा समीर सय्यद असे अटक आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी आणि फिर्यादी दोन्ही कोल्हापूर येथील आहेत. सिद्धी वैद्य या नावाने ती त्यांच्या घरात राहत होती. फिर्यादी यांचे भाऊ  वकील असून त्यांच्या संपर्कात अशील म्हणून आरोपी आली होती. आर्थिक चणचण आणि राहण्याची समस्या असल्याचे तिने त्यांना सांगितल्याने माणुसकीच्या नात्याने त्यांनी तिला बहिणीच्या घरी पोटभाडेकरू म्हणून व्यवस्था केली. फिर्यादी या काही कामानिमित्त गावी गेल्या होत्या. आरोपी महिलेकडेही घराच्या किल्लय़ा होत्या. दरम्यान, आरोपीने घरातील १७.३ तोळे व ५ हजार रोख रक्कम असा ७ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरी केला होता. फिर्यादी गावावरून परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली होती. तपासात आरोपी महिला ऐरोली येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तिची झडती घेतली असता तिच्याकडे १४.२ तोळे सोन्याचे दागिने व ७०० रुपये रोख असा ६ लाख ६७ हाजार २०० रुपयांचा ऐवज आढळून आला. सदर महिला ही गावी पळून जाण्याच्याच तयारीत होती.

आरोपी महिलेचे खरे नाव काय आहे, तिने चोरीचे सोने कोणाला विकले, तसेच तिची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा शोध सुरू आहे. नागरिकांनी भाडेकरू असो वा पोटभाडेकरू त्यांना घर देताना त्यांची पार्श्वभूमी पाहावी तसेच कायद्यानुसार करारनामा करून घ्यावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक  नितीन गीते यांनी केले आहे.