पावसाची रिपरिप, हवेत गारवा ; शहर व मोरबे पाणलोट क्षेत्रात फक्त १८ मि.मी. पावसाची नोंद

नवी मुंबईत १० जूनपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र आतापर्यंत मोठा पाऊस झालेला नाही.

rain in maharashtra
सांकेतिक फोटो

नवी मुंबई : बुधवारी रात्री १२ च्या सुमारास नवी मुंबईत काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते. मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मारबे धरण पाणलोट क्षेत्रात फक्त १८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत नवी मुंबई २४१ मि.मी पाऊस झाला आहे.

नवी मुंबईत १० जूनपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र आतापर्यंत मोठा पाऊस झालेला नाही. पावसाने गेले २० दिवस दडी मारल्याने शहरावर कधी नव्हे ती पाणीकपातीची वेळ आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात गेल्या वर्षीपेक्षा पाचपटीने कमी पातळी असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आणखी काही दिवस पावसाची हीच परिस्थिती राहिल्यास पाणीकपातीची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लागून आहेत. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास काही भागांत अर्धा तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे पावसाने जोर धरल्याचे बोलले जात होते. मात्र गुरुवारी दिवसभर शहरात व मोरबे धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. त्यामुळे दिवसभरात फक्त १८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात शहरात सर्वाधिक पाऊस नेरुळ परिसरात झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद ऐरोली विभागात झाली आहे. सायंकाळनंतर पावसाने थोडा जोर पकडला असल्याचे दिसून आले.

पाण्याचे नियोजन सुरू

पालिका प्रशासन शहरातील व मोरबे धरणातील दैनंदिन पावसावर नजर ठेवून आहे. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास मात्र पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे त्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

दिवसभरातील पाऊस मिलिमीटरमध्ये

बेलापूर – १५.८

नेरुळ – २३.८

वाशी – २२.४

कोपरखैरणे – १९.४

ऐरोली – ६.००

दिघा – २०.८

सरासरी पाऊस – १८.०३ .

आतापर्यंत एकूण पाऊस – २४३ मिमी.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 18 mm rainfall recorded in navi mumbai city and in morbe dam area zws

Next Story
उरणमध्ये महिनाभरात केवळ दहा टक्के पाऊस
फोटो गॅलरी