तिसरी लाट लांबविण्याकरिता पालिकेचे नियोजन

नवी मुंबई : नवी मुंबईत आतापर्यंत १४ लाखांपेक्षा जास्त जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून एप्रिलनंतर जुलै महिन्यात सर्वाधिक २ लाख १२ हजार ९६५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये २ लाख २९ हजार ४७८ चाचण्या करण्यात आल्या होत्या.

करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असून ती जास्तीत जास्त लांबविण्याकरिता शहरात प्रभावी उपाययोजना राबविण्यावर नवी मुंबई महापालिका प्रशासन भर देत आहे. ‘ मिशन ब्रेक द चेन’अंतर्गत चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी ७ नंतर महापालिका आयुक्त दूरचित्रसंवादाद्वारे अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. त्या दिवसात आढळलेले रुग्ण, त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती व लसीकरण याबरोबरच दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्यात येत आहे.

त्यानुसार करोना रुग्णाच्या संपर्कातील जास्तीत जास्त जणांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यामुळे संसर्ग आटोक्यात राहात आहे. वेळीच विलगीकरण केल्यामुळे अनेकांना होणारी बाधा टळत आहे. त्यामुळे आज काही प्रमाणात करोना रुग्णांची संख्या ६० ते १०० रुग्णसंख्येवर स्थिरावली आहे.

जुलै महिन्यातच २ लाख १६ हजार ४११ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १ लाख ६३ हजार ५०४ नागरिकांचे प्रतिजन तसेच ५२ हजार ९०७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी ७ हजार नागरिकांच्या चाचण्या होत आहेत.

त्यासोबतच सर्व रेल्वे स्थानके, एपीएमसी मार्केटची प्रवेशद्वारे, बाजार व वर्दळीच्या जागा या ठिकाणीही तपासणीवर भर देण्यात आलेला आहे. दैनंदिन करोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली तरी तपासणीची संख्या कमी न करता उलट ती वाढवून करोना प्रसार वेळीच खंडित करण्याचे नियोजन आहे. यामुळे रुग्णवाढीचा दरही कमी झाल्याचे दिसत आहे.