पनवेल ः दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवात कोकणातील गाव गाठण्यासाठी तब्बल २० तासांहून अधिकचा काळ वाहतूक कोंडीत अडकून पार करावे लागल्यामुळे कोकणवासीय हैराण झाले आहेत. सरकारने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा वाहतूक विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा फोल ठरला आहे. शेकडो वाहने एकाच वेळी रस्त्यावर धावणार असल्याचे माहिती असतानाही रस्त्यातील खड्ड्यांमुळे आणि नियोजन नसल्याने कोकणात जाणाऱ्या ज्येष्ठ नागरीक, बालक आणि महिला प्रवाशांना प्रचंड हाल सहन करत खडतर प्रवासाचा अनुभव गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत आला.
११ दिवसांपूर्वी याच महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करुन खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतरही परिस्थिती बदलू शकली नाही. गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून मुंबईतून कोकणातील विविध तालुक्यांमध्ये मुंबई गोवा महामार्गावरुन धावणाऱ्या वाहनांना या कोंडीचा सर्वात मोठा फटका सहन करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी साडेचारवाजेपर्यंत ही वाहने राजापूर तालुक्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती. एरव्ही मुंबई ते कुडाळ या ८ ते ९ तासांच्या प्रवासाला तब्बल दुप्पट काळ लागल्याने प्रवाशांची कोंडी झाली. रात्री रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रात्री १० वाजता मालाड येथील प्रताप सावंत त्यांच्या कुटुंबियांना घेऊन खासगी वाहनाने कुडाळ येथे निघाले होते. परंतु सकाळी सात वाजेपर्यंत प्रताप यांची मोटार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यापर्यंत वाहतूक कोंडीत अडकली होती. तसेच संगमेश्वर येथेही अशीच कोंडी अनुभवायला मिळाली. ही कोंडी कधी फुटणार नेमके याचे उत्तर देण्यासाठी कोणतेही स्वयंसेवक किंवा इतर यंत्रणा वाहतूक विभागाने उभारली नव्हती.
हेही वाचा – पनवेल : शेकापचे जे. एम. म्हात्रे यांच्यावर वन विभागाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल
हेही वाचा – खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
प्रताप सावंत यांच्या कुटुंबियांप्रमाणे शेकडो वाहनांमधील महिला, बालक तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये त्रास सहन करावा लागल्याची माहिती कुडाळ येथे जाण्यासाठी निघालेल्या श्रावणी सावंत यांनी दिली. सरकारला जुना मुंबई गोवा महामार्गाचे कॉंक्रीटीकरण झपाट्याने करण्यापेक्षा नवीन रेवस ते रेड्डी या द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनात रस असल्याची टीका शुक्रवारी वाहतूक कोंडीत अडकलेल्या कोकणवासीयांकडून केली जात होती.