नवी मुंबई : रात्री-अपरात्री सेवा रस्ते व एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे बीभत्स व अश्लील चाळे करून वाहनचालकांना आकर्षित करणाऱ्या २१ तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला तृतीयपंथीय उभे राहून अश्लील चाळे करीत वाहनचालकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यांच्यावर फारशी कारवाई होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संख्येत वाढ होत होती. अनेकदा एकट्या-दुकट्या व्यक्तीला लुटण्याचे प्रकार होतात, मात्र पोलीस ठाण्यात येण्याचे लोक टाळतात. रात्री उशिरा तर रस्त्याच्या मध्यापर्यंत तृतीयपंथी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे. ही परिस्थिती निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अशा लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हेही वाचा.अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास मंदगतीने त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी तीन विशेष पथके तयार केली. या पथकांनी निर्देश दिल्याप्रमाणे कारवाईअगोदर काही दिवस साध्या वेशात पाहणी केली. हेही वाचा.विजय चौगुलेंचे गणेश नाईक यांच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू नवी मुंबई पोलीस आयुक्त परिसरातील उरण फाटा सेवा रस्ता, जुईनगर सेवा रस्ता तसेच एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे तोकडे कपडे परिधान करून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना टाळ्या वाजवून हातवारे व बीभत्स हावभाव आणि अश्लील चाळे करत असल्याचे निदर्शनास आल्यावर ३० तारखेला रात्री या तिन्ही ठिकाणी कारवाई केली. या वेळी उरण फाटा सेवा रस्त्यावरील तीन तृतीयपंथी, जुईनगर सेवा रस्ता येथील तब्बल १२ तृतीयपंथी तसेच एपीएमसी ट्रक टर्मिनल येथून सहा तृतीयपंथीयांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सीबीडी, नेरुळ, एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आहेत.