खासगी रुग्णालयांत १९ तर पालिका रुग्णालयांत ४ जणांवर उपचार

नवी मुंबई : मुंबई, ठाणे शहरांप्रमाणे नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून या रुग्णांची संख्या २३ पर्यंत गेली आहे. यात खासगी रुग्णालयात १९ तर महापालिका रुग्णालयांत ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ३५ टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मागील आठवडय़ात फक्त सात रुग्ण होते.

नवी मुंबईत १० मेनंतर  म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करीत असताना आता या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णवाढ होत असल्याने महापालिकेच्या तीन रुग्णालयांत यावर उपचार पद्धती सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञांची पथके बनविण्यात आली आहे.

१९ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत हा बुरशीजन्य आजार असून तो करोना झालेल्या रुग्णांना होत असून यात इतर

आजार असणाऱ्यांना याचा धोका अधिक आहे.  त्याचप्रमाणे करोना उपचारादरम्यान गरज नसताना दिलेल्या स्टेरॉइडमुळे होत आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. खासगी रुग्णालयांत १९ तसेच महापालिकेच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात अधिगृहीत केलेल्या खाटांवर ४ रुग्ण उपचार घेत आहेत.

स्टेरॉईडची मात्रा टाळावी

करोनाबाधित रुग्णांवर

आवश्यक नसताना काही वेळा रेमडेसिविर व स्टेरॉईडचा वापर करावा लागतो. मधुमेह रुग्ण असेल तर उपचारादरम्यान त्याची शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे करोना उपचारानंतर मधुमेहावर नियंत्रण ठेवले पाहिजे. गरज नसेल तर करोना उपचारात स्टेरॉईडचा वापर करू नये,

असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नवी मुंबईत ही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराच्या उपचारासाठी लागणारे औषधे, इंजेक्शन यांचा सध्या तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वेळीच रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. करोना उपचारादरम्यान गरज असेल तरच स्टेरॉइडचा वापर करावा.

– डॉ. योगेश नारखेडे, कान, नाक, घसातज्ज्ञ, महापालिका