उरणमध्ये महावितरणचे पालथ्या घडय़ावर पाणी
उरण तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून या पावसाबरोबरच उरणमध्ये विजेच्या लपंडावही सुरू झाला आहे. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील नागरिकांना पावसाळ्यात अनेकदा २४ तास विजेविनाच काढावी लागत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे उरण शहरातील वीज ही सातत्याने ये-जा करीत असल्याने येथील विद्यार्थी, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
महावितरणने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे; मात्र सध्याच्या आठवडाभरात सुरू झालेल्या पावसाने हा दावा फोल ठरविला आहे. शुक्रवारी उरण तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहिनीवर भले मोठे झाड कोसळल्याने बारा तासांपेक्षा अधिक काळ संपूर्ण तालुका विजेविनाच होता. मात्र याच कालावधीत उरण पूर्व विभागात चोवीस तासांपेक्षा अधिक काळ वीज गायब असल्याची माहिती खोपटे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी दिली.
उरण पूर्व विभागाला वीजपुरवठा करणारी विद्युत वाहिनी ही तीस किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची आहे. मात्र ही स्थिती ज्या वेळी उरण पूर्व व पश्चिम विभागाला जोडणारा खोपटा पूल तयार झालेला नव्हता तेव्हाची होती. हा पूल तयार होऊन २५ वर्षे झाली. याच खाडीवर आणखी एक नवीन पूल आहे.
या परिसरातील नागरिकांच्या वीजपुरवठय़ात नियमितता आलेली नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ऐन सणाच्या वेळीही अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने वीज दरांची वाढ करणाऱ्या महावितरणने नियमित वीजपुरवठय़ाची मागणी नागरिकांनी केली आहे. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एस. साळी यांनी नवीन उपकेंद्र सुरू झाल्यानंतर ही समस्या दूर होईल, असे सांगितले.