नवी मुंबई : करोना परिस्थिती आटोक्यात आल्याने दिवाळीत लस घेण्यासाठी नागरिक उत्सुक नव्हते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे ८० हजार लसमात्रा शिल्लक होत्या. आता दिवाळीनंतर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला असून मंगळवारी ३५ केंद्रांवर २६ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

दिवाळीतील चार दिवसांत महापालिका प्रशासनाने इतर लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. फक्त महापालिकेच्या प्रमुख चार मोठय़ा रुग्णालयांत लसीकरण सुरू ठेवले होते. 

नवी मुंबईत १८ वर्षांवरील लसपात्र नागरिकांची संख्या ११ लाख ७ हजार असून आतापर्यंत पहिली मात्रा ११ लाख २७ हजार ७३२ जणांनी घेतली आहे. तर दुसरी मात्रा ही ६ लाख २४  हजार ३५४ जणांनी घेतली आहे. नवी मुंबईत पहिल्या लसमात्रेचे लसीकरण पूर्ण झाल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना किमान एकमात्रेचे लसकवच मिळाले आहे. मात्र दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण हे ५५ टक्केपर्यंतच आहे. गेले तीन आठवडे यात मोठी वाढ होत नसल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला लस घेण्यासाठी तासन्तास रांगा लावून लस घेतली जात होती, आता पालिकेकडे लसमात्रा शिल्लक राहत आहेत. परंतु लस घेण्यासाठी नागरिक येत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपल्या कॉल सेंटरवरून दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र नागरिकांशी संपर्क सुरू केला आहे. दिवाळी असल्याने लस घेतल्यावर ताप, कणकण जाणवते. त्यामुळे आता नको, नंतर घेऊ असा प्रतिसाद दिला जात होता.

आता दिवाळी संपली असून नागरिकांनी आपली दुसरी मात्रा घ्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. सोमवारी २०,००० कोव्हिशिल्ड तर ६,००० कोव्हॅक्सिन लसमात्रा मिळाल्या आहेत. त्यामुळे मंगळवारपासून ३५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

लसीकरण

* पहिली मात्रा : ११,२७,७३२

* दोन्ही मात्रा :  ६,२४,३५४

* एकूण लसमात्रा : १७,५२,०८६